Pune Hording collapse at Ahilyanagar Wagholi near Sanaswadi


मुंबईतील घाटकोपर येथे 14 मे 2024 ला महाकाय होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. या घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला होता. पण आता वर्षभरानंतर या घटनेच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या असून पुण्यात देखील वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

पुणे : मागील वर्षी म्हणजेच 2024 मध्ये मुंबईतील घाटकोपर पूर्व येथील एका पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग कोसळल्याची घटना घडली होती. 14 मे 2024 ला घडलेल्या या घटनेमध्ये 16 निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला तर 70 पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. या घटनेचे व्रण अजूनही कायम आहेत. तर आता पुन्हा एकदा वर्षभरानंतर या घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. कारण मंगळवारी (ता. 20 मे) पुण्यात सुद्धा होर्डिंग कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळल्याने अनेकांना मुंबईत घडलेल्या घटनेची आठवण आली आहे. (Pune Hoarding collapse at Ahilyanagar Wagholi near Sanaswadi)

आज सकाळपासूनच पुण्यामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. त्यामुळे पुण्यात आज अवकाळी पावसाच्या सरी बरसणार असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला होताच. पण दुपारनंतर पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. ज्यानंतर पुण्यातील काही भागांमध्ये पाणी साचले. तर या पावसामुळे पुण्यातील विमानतळ्याच्या नव्या टर्मिनलवर पुन्हा एकदा पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. पुण्यातील बहुतांश भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झालेली असतानाच पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर वाघोलीजवळ सणसवाडी येथे ही हार्डिंग कोसळल्याची घटना घडली. या घटनेत सात ते आठ दुचाकी अडकल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

हेही वाचा… Slab Collapses In Kalyan: सप्तशृंगी इमारतीचा स्लॅब कोसळला, दीड वर्षांच्या चिमुकलीसह पाच जणांचा मृत्यू

पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर वाघोलीजवळ सणसवाडी येथे हार्डिंग कोसळल्याची घटना घडल्यानंतर काही वेळातच फुरसुंगी येथील मंतरवाडी चौक येथेही होर्डिंग कोसळल्याची घटना घडली. पण या दोन्ही घटनांमध्ये केवळ वित्तहानी झाली असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण यामुळे आता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कारण पुण्यात अनेक ठिकाणी होर्डिंग असून अशी घटना पुन्हा घडण्याची भीती पुणेकरांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.



Source link

Comments are closed.