Sandeep Deshpande stated that the Thackeray group is now preparing to threaten the Sharad Pawar group and the Congress
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वत: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र येण्याबाबत वक्तव्य केलं आहे. महत्त्वाचे म्हणजे राज ठाकरे यांनी युतीसाठी दिलेल्या टाळीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिटाळी दिली आहे. त्यामुळे सध्या राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत चर्चा रंगली आहे. मात्र मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे गट आता पवार गट आणि काँग्रेसला धोका देण्याच्या तयारीत, अशा धोका देणाऱ्या पक्षावर आम्ही विश्वास ठेवायचा, तर तो कोणत्या मुद्द्यावर ठेवायचा. हा प्रश्न माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला पडतो आहे, असे म्हटले आहे.
पत्रकारांशी संवाद साधताना संदीप देशपांडे म्हणाले की, त्यावेळी श्रीधर पाटणकर मला भेटले. त्यांनी मला सांगितलं की, दोन्ही भावांना आपण एकत्र आणलं पाहिजे. दोन्ही भावांनी एकत्र येऊन महाराष्ट्र हिताच्या आणि सर्व गोष्टी झाल्या पाहिजेत, असा त्यांनी एक प्रस्ताव ठेवला. त्यांनी राज ठाकरे यांच्याशी मी चर्चा केली. आम्ही श्रीधर पाटणकरांना सांगितलं की, या गोष्टीवर चर्चा होऊ शकते. त्यानंतर युती होऊ शकते की नाही, ते आपण ठरवू. त्याप्रमाणे आमची भेट झाली. त्यानंतर आमच्या पक्षाच्या वतीने संतोष धुरी हे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना भेटायला गेले. तेव्हा उद्धव ठाकरे असं म्हणाले होते की, आमचं आता भाजपासोबत लग्न आहे, ते लग्न आधी मोडू दे. त्यानंतर आपण साखरपुडा करू. मग कोण किती जागा लढवेल, हा विषय होईल.
त्याप्रमाणे 26 जानेवारीला उद्धव ठाकरे यांनी भाजपासोबतची युती मोडली. त्यानंतर श्रीधर पाटणकर आणि उद्धव ठाकरे यांनी आमचे फोन उचलणे बंद केले. त्याआधी 2014 मध्ये उद्धव ठाकरे आणि भाजपाची युती तुटली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याशी संपर्क केला आणि दोघांमध्ये ठरलं की, आपण निवडणूक एकत्र लढवूया. आमच्याकडून बाळा नांदगावकर आणि शिवसेनेकडून अनिल देसाई चर्चा करतील, असं ठरलं होतं. त्यासाठी राज ठाकरे यांनी एबी फॉर्म थांबवून ठेवले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि अनिल देसाई हे दोन दिवस फोन उचलत नव्हते. अनिल देसाई यांनी शेवटपर्यंत एबी फॉर्म वाटायला सुरुवात केली, पण आम्ही मनसेचे एबी फॉर्म थांबवून ठेवले होते, अशी माहिती देशपांडे यांनी दिली.
हेही वाचा – Sanjay Raut : राज ठाकरेंची भूमिका नाकारण्याचा करंटेपणा…; दोन्ही ठाकरे एकत्र येण्यावर काय म्हणाले राऊत?
संदीप देशपांडे म्हणाले की, शिवसेनेने 2014 आणि 2017 ला आम्हाला धोका दिला. आज संजय राऊत आणि उद्धव ठाकरे म्हणत आहेत, जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत, त्यांच्यासोबत राज ठाकरे जेवतात. पण 2019 पर्यंत राज ठाकरे तुमचे शत्रू नव्हते. परंतु त्याआधी नोटबंदी झाली किंवा भाजपाचे जे काही निर्णय झाले, ते महाराष्ट्र हिताचे नव्हते. त्या निर्णयांना विरोध करणारे त्यावेळी राज ठाकरे होते. पण त्यावेळेला भाजपा शिवसेनेसोबत चांगला होता. कारण भाजपाने 50-50 टक्के सत्तेचा वाटा देण्याचं कबूल केलं होतं. त्यानंतर 2019 लाही दोघांनी एकत्र निवडणुका लढवल्या. तोपर्यंत भाजपा चांगला होता. 2019 नंतर त्यांच्यात काय झालं, मला माहित नाही. पण 2019 नंतर भाजपा पक्ष महाराष्ट्राद्रोही कसा झाला? भाजपाची भूमिका काय आहे, हे शिवसेनेला 2019 आधी माहित नव्हतं का? उद्धव ठाकरे 2017 मध्ये एका भाषणात म्हणाले की, भाजपासोबत गेली 25 वर्षे युतीत आम्ही सडलो. पण त्याच भाजपासोबत त्यांनी 2019 ला लोकसभेत आणि विधानसभेत युती केली.
संदीप देशपांडे म्हणाले की, ज्या पक्षाबरोबर शिवसेनेने 2019 मध्ये युती केली, त्यांच्यासोबत युती तोडून ते शरद पवार आणि काँग्रेसच्या नादी लागले. त्यांच्यासोबत त्यांनी आघाडी स्थापन केली आणि त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. माझा एक सरळ सोपा आणि एक मार्काचा प्रश्न आहे. जर अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरेंना मिळालं असतं, तर आज त्यांच्या लेखी भाजपा पक्ष महाराष्ट्रद्रोही असता का? याच उत्तर उद्धव ठाकरे यांनी पहिलं दिलं पाहिजे. तुम्ही आतापर्यंत आम्हाला धोका देत आला आहात. यानंतर तुम्ही भाजपाला धोका देऊन दुसरीकडे गेलात. आता तुम्ही शरद पवार आणि काँग्रेसला धोका देण्याच्या तयारीत आहेत. अशा धोका देणाऱ्या पक्षावर आम्ही विश्वास ठेवायचा, तर तो कोणत्या मुद्द्यावर ठेवायचा. हा प्रश्न माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला पडतो आहे. बाकी युती करायची की नाही, याचा निर्णय राज ठाकरे करतील, अशी भूमिका संदीप देशपांडे यांनी मांडली.
हेही वाचा – Raj Thackeray : माझा इगो नाही, एकत्र येणंही कठीण नाही पण विषय इच्छेचा; राज ठाकरेंकडून टाळीसाठी हात पुढे
Comments are closed.