Sanjay Lele son recounts the bloody thrill of the terrorist attack in Pahalgam


डोंबिवली (रोशनी खोत) : काश्मीरमधील निसर्गरम्य पहलगाममध्ये एक अकल्पनीय आणि काळजाला चिरत जाणारा दहशतवादी हल्ला घडला. ज्यात देशभरातील 26 पर्यटकांचे प्राण गेले. यामध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा समावेश होता. ज्यात डोंबिवलीतील तीन मावस भावांच्या मृत्यूमुळे संपूर्ण परिसर शोकाकुल झाला. अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी हे तीन नातेवाइक एकत्र फिरायला गेले होते, पण परतले केवळ आठवणी आणि अश्रू घेऊन. संजय लेलेंचा मुलगा हर्षल लेले यांनी पत्रकार परिषदेत या संपूर्ण हल्ल्याचा थरार सांगितला आणि उपस्थितांचे काळीज हेलावलं. (Sanjay Lele son recounts the bloody thrill of the terrorist attack in Pahalgam)

“दहशतवादी आले, त्यांनी गोळ्या झाडल्या आणि निघून गेले… एखाद्या फिल्ममध्ये वाटावा असा सीन प्रत्यक्षात आम्ही अनुभवला,” अशा शब्दांत हर्षल लेले यांनी पहलगाममधील रक्तरंजित घटनेचं वर्णन केलं. त्याने सांगितले की, “गोळीबार सुरु झाला तेव्हा माझा हात वडिलांच्या डोक्यावर होता. ते दहशतवाद्यांना विनंती करत होते की गोळीबार करू नका. त्यांनी हात वर केला होता. त्या क्षणी माझ्या हाताला काहीतरी जाणवलं आणि वाटलं की माझ्या हाताला गोळी लागली. पण माझ्या हाताला चाटून गेलेली गोळी वडिलांनी लागली होती. मागे वळून पाहिलं तेव्हा वडिलांचं डोकं रक्ताने माखलेलं दिसलं,” असं सांगताना हर्षलच्या आवाजात वेदना दाटून आल्या.

हर्षल लेले म्हणाला की, ही संपूर्ण घटना दुपारी दोन ते अडीचच्या दरम्यान पहलगाम येथे घडली. हल्ल्यानंतर आम्हाला स्थानिकांनी सांगितलं की, आधी तुम्ही तुमचा जीव वाचवा. पण आम्ही जिथे होतो, तिथे वाहन जात नाही, फक्त घोड्यावरून जाता येतं. आम्ही बैसरन पर्वत रांगांमधून खाली चालत उतरायला लागलो आणि त्या प्रवासाला चार तास लागले. संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. माझ्या आईला अर्धांगवायू आहे. आम्ही तिला खांद्यावर उचलून खाली आणलं. नंतर घोड्यांनी तिला बेसला पाठवलं. घटनेनंतर सर्व जखमींना रुग्णालयात नेण्यात आलं, असंही त्याने सांगितलं.

हेही वाचा – Pahalgam Attack : आमच्या कर्त्या पुरुषांना मारलं आणि आम्ही…; डोंबिवलीतील कुटुंबीयांनी सांगितली आपबिती

हर्षल म्हणाला की, “संध्याकाळी 6 वाजता आम्ही बेसवर पोहोचलो, पण पुढचे काही तास आम्हाला काहीही माहिती नव्हती. रात्री 7.30 च्या सुमारास तिघांच्या मृत्यूची बातमी समजली.” कुटुंबीयांनी एक आयपीएस अधिकाऱ्याच्या मदतीने आमच्यासाठी राहण्याची जागा मिळाली. दुसऱ्या दिवशी सकाळी मृतदेहांची ओळख पटवण्यात आली.
एक चार वर्षांच्या मुलावरही गोळीबार झाला होता. आम्ही पोलीस कंट्रोल रूममध्ये गेलो तेव्हा ओमर अब्दुल्ला, अमित शहा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आले होते. नंतर आमचे नातेवाइक राजेश कदम आले आणि आम्हाला मुंबईला आणलं. बुधवारी माझ्या वडिलांवर अंत्यसंस्कार पार पडले.”

दहशतवादाचा चेहरा कधीच मानवी नसतो

दरम्यान, डोंबिवलीच्या तीन मावस भावांचे असे अचानक झालेले निधन केवळ त्यांच्या कुटुंबीयांसाठीच नव्हे, तर संपूर्ण शहरासाठी धक्कादायक आहे. हर्षल लेले यांनी दिलेली ही थरारक आपबीती ही एक जबरदस्त साक्ष आहे की, दहशतवादाचा चेहरा कधीच मानवी नसतो. निसर्गाच्या सान्निध्यात ज्या आठवणी तयार व्हायला हव्या होत्या, त्या रक्तरंजित वास्तवात बदलल्या आणि कधीही न विसरता येणाऱ्या वेदनांचा भाग बनल्या. या संपूर्ण घटनेत त्या ठिकाणी एकही सुरक्षा रक्षक नसल्याचा उल्लेख देखील त्याने केला आणि या दहशतवादाविरोधात कठोर कारवाईची मागणी देखील हर्षल लेले याने यावेळी केली. पत्रकार परिषदेत हर्षलसोबत ध्रुव जोशी, ऋचा मोने, अनुष्का मोने आणि त्यांचे इतर नातेवाइक उपस्थित होते.

हेही वाचा – Pahalgam Attack : दहशतवादी हल्ल्यानंतर मुस्लिम संघटना आक्रमक; आम्हाला बॉर्डरवर जाऊ द्या, जय श्रीरामचे नारे देऊन…



Source link

Comments are closed.