Sanjay Raut Shivsena UBT on marathi hindi conflict and CM Devendra Fadnavis
मुंबई : गेल्या काही दिवसापासून राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग उठला आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा हिंदी सक्तीवरून राज्य सरकारवर टीका केली आहे. आगामी मुंबई पालिका निवडणुकीसाठी राज्यात हिंदीची सक्ती करून हिंदी भाषिकांना खुष करण्याचे काम हे सरकार करत असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. “हिंदी सक्ती कोणासाठी? कोणाचे रेशनिंग कार्ड वाढवत आहात?” असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्र्यांनी मराठी भाषेचा मराठी माणसाचा तसेच मराठी शाळांचा विचार करावा, असा सल्लादेखील यावेळी त्यांनी दिला आहे. (Sanjay Raut Shivsena UBT on marathi hindi conflict and CM Devendra Fadnavis)
हेही वाचा : Hindi Language Compulsory : ‘खोबरं तिकडे चांगभलं’ अशा भूमिकेत राहू नये, ठाकरेंनी मराठी कलावंतांना सुनावले
शिवसेना उबाठा संजय राऊत म्हणाले की, “सोमवारी सरकारने एक बैठक घेतली. कसल्या बैठका घेत बसले आहात? एक आदेश काढा आणि विषय संपवून टाका. महाराष्ट्रात मराठी भाषेची अवहेलना करत आहात. आतापर्यंत मुख्यमंत्र्यांनी मराठी भाषेवरून एकतरी बैठक घेतली आहे का? मराठी भाषा, मराठी माणूस, मराठी स्वाभिमान आणि मराठीवरील अन्याय यावर एकतरी बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारने घेतली आहे का?” असा सवाल त्यांनी यावेळी केला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गुजरातमध्ये हिंदी सक्ती का केली नाही? हा प्रश्न विचारायची हिम्मत आहे का? शिंदेंच्या बगलबच्चांना.” असे ते म्हणाले.
साहित्यिकांशी चर्चा करण्याची गरज काय?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साहित्यिकांशी चर्चा केल्यानंतर अंतीम निर्णय घेऊ, असे सोमवारी झालेल्या बैठकीनंतर सांगितले होते. त्यावर संजय राऊत थेट म्हणाले की, साहित्यिकांशी चर्चा करण्याची गरज नाही. “किती साहित्यिक आले? साहित्यिकांशी हिंदी भाषेसंदर्भात चर्चा करण्याची गरजच काय? कोण साहित्यिक मला 10 नावे सांगा. साहित्यिकांना मराठी भाषेसंदर्भात एवढी चिंता असती तर हिंदी भाषा लादली जात आहे, त्याच्यावर साहित्यिकांनी सवाल केला असता,” असे म्हणत त्यांनी टीका केली. “प्रकाशराज जसे कर्नाटकात उठले आहेत, तसे कुठे आहेत, नाना पाटेकर, प्रशांत दामले?” असा सवाल त्यांनी यावेळी केला. “भाजपमध्ये असलेल्या सगळ्या नेत्यांची मुले इंग्रजी शाळेत शिकत आहेत. मी अभिमानाने सांगतो माझ्या मुली मराठी शाळेत शिकल्या आहेत. साहित्यीकांची मुले इंग्रजी शाळेत शिकत आहेत. आम्हाला शिकवू नका.” असा घणाघात त्यांनी यावेळी केला.
Comments are closed.