Sanjay Shirsat aggressive over using Social Justice Department funds for Ladki Bahin Yojana


लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा निधी वळवण्यात आला आहे. याकरिता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागासाठी मंजूर 3,960 कोटींपैकी 410 कोटी 30 लाख रु. वर्ग करण्यात आले आहेत. पण अर्थखात्याच्या या मनमानी कारभारावर सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होऊ लागला आहे. सरकारी तिजोरीत खडखडाट असतानाही लाडक्या बहिणी नाराज होऊ नये, याकरिता सरकारकडून लाडकी बहीण योजनेचे हप्ते जमा करण्यात येत आहेत. पण एप्रिल महिन्यात जमा करण्यात आलेल्या पैशांसाठी आदिवासी विकास खात्यातील आणि सामाजित न्याय व विशेष सहाय्य विभागाचे पैसे वळवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ज्यामुळे आता महायुतीतच मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्टपणे नाराजी व्यत्त करत अर्थखात्यावर टीकास्त्र डागले आहे. (Sanjay Shirsat aggressive over using Social Justice Department funds for Ladki Bahin Yojana)

लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा निधी वळवण्यात आला आहे. याकरिता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागासाठी मंजूर 3,960 कोटींपैकी 410 कोटी 30 लाख रु. तसेच आदिवासी विकास खात्याला दिलेल्या 3,420 कोटींच्या सहाय्यक अनुदानातून तब्बल 335 कोटी 70 लाख रुपये लाडकी बहिण योजनेसाठी देण्यात आले आहेत. यासंबंधिचा शासन निर्णय शुक्रवारी (ता. 2 मे) जारी करण्यात आला. ज्यानंतर सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट यांनी तीव्र संताप व्यक्त केला. प्रसार माध्यमांशी संवाद साधत मंत्री शिरसाट म्हणाले की, तुमच्या माध्यमातून कळले जवळपास सव्वाचारशे कोटी वर्ग करण्यात आले आहेत, याची मला कल्पना आणि माहिती नाही. पण सामाजिक खात्याची आवश्यकता नसेल तर खातं बंद केले तरी चालेल, असे म्हणत शिरसाट संतापले.

हेही वाचा… Ambadas Danve : लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विकास खात्यातील पैसा वळवला, दानवेंच्या आरोपाने खळबळ

तर, मला याची काहीच कल्पना नाही, याबाबत मी मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करेल, फायनान्स डिपार्टमेंट आपली मनमानी चालवत आहे, आपण म्हणू तेच खरं म्हणत आहेत. या खात्याचा कायदेशीर निधी वर्ग करता येत नाही, कट करता येत नाही, फायनान्स डिपार्टमेंटवाले आपले डोके जास्त चालवत असतील तर हे बरोबर नाही, हे स्पष्टपणे सांगतो. आदिवासी समाज कल्याण खाते कशासाठी निर्माण झाले आहे? इतर खात्यातून पैसे वर्ग करता येत नाहीत का? हे मला पटलेले नाही, मुख्यमंत्री चर्चा करेल. माझे मागच्या वर्षीचे दायित्व 1500 कोटी रुपयांचे आहे. इतर खात्याचे वर्ग झाले की काय माहिती नाही. मात्र, सामाजिक खात्याचे पैसे वर्ग झाले हे सत्य आहे, अशी माहिती मंत्री शिरसाट यांनी दिली.

तसेच, माझ्या खात्याचा निधी तुम्हाला इतर ठिकाणी वर्ग करता येत नाही, हा नियम आहे. कायदा आहे. अर्थखात्याच्या विभागात काही जण बसले आहेत, त्यांना जर आपण हुशार आहोत असे वाटत असेल तर त्यांनी मला हे दाखवले पाहिजे. मला त्यांनी निधी वर्ग करता येतो, याबाबतचा नियम सांगावा. त्यामुळे निधी वर्ग करता येत असेल तर मी त्यांची माफी मागेन, लाडकी बहीण लाडकी आहे, पण फायनान्समध्ये बसलेले शकुनी आहेत, त्यांनी केलेले हे काम आहे, असे म्हणत मंत्री शिरसाट अर्थ खात्याचे मंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे सडकून टीका केली आहे. त्यामुळे आता महायुतीत यामुळे नव्या वादाची ठिणगी पडली असल्याची चर्चा सुरू झाली आहे.



Source link

Comments are closed.