ST Bus fuel cost pushes msrtc towards greener alternatives says Minister of Transport
मुंबई : एसटी महामंडळ दरवर्षी 5 हजार याप्रमाणे पुढील 5 वर्षांमध्ये 25 हजार बसेस घेण्यात येणार आहेत. सन 2025-26 पासून उर्वरित 20 हजार बसेस या पर्यावरण पूरक अशा सीएनजी आणि एलएनजीसारख्या इंधनाबरोबर डिझेल इंधन हायब्रीड करून चालणाऱ्या असणार आहेत. डिझेल इंधनाचा वापर फक्त आपत्कालीन परिस्थितीत केला जाईल, जेणेकरून बस प्रवाशांची गैरसोय होणार नाही, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ते पर्यावरण पूरक इंधनाच्या संदर्भात बोलावलेल्या एसटी अधिकारी आणि संबंधित इंधन पुरवठा दार संस्थांच्या बैठकीमध्ये बोलत होते. (ST Bus fuel cost pushes msrtc towards greener alternatives says Minister of Transport)
हेही वाचा : Congress : त्या पक्षांना सोबत घेऊन काँग्रेस भाजपाविरोधात लढत राहणार, काय म्हणाले प्रदेशाध्यक्ष सपकाळ?
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, “एसटीकडे बहुतेक सर्व बसेस डिझेल इंधनावर चालणाऱ्या आहेत. महामंडळाच्या एकूण खर्चापैकी सुमारे 34 टक्के खर्च हा इंधनावर होतो. दररोज सुमारे 10 लाख 70 हजार लिटर इतके डिझेल लागते. वर्षाला सुमारे 34 हजार कोटी रुपये इंधनावर खर्च होतात. भविष्यात डिझेल इंधनाची उपलब्धता आणि वारंवार होणारा दरातील बदल लक्षात घेता पर्यायी इंधन वापरणे आवश्यक आहे.” असे त्यांनी यावेळी सांगितले. “सीएनजी आणि एलएनजी हे पर्यायी इंधन प्रकार तुलनेने डिझेल पेक्षा स्वस्त आहे. तसेच हे इंधन पर्यावरण पूरकदेखील आहेत. या इंधनाची कार्यक्षमता चांगली असल्याने बस प्रति लीटर 5-5.5 किलोमीटर अंतर चालते. डिझेल इंधनावर मात्र बस प्रति लिटर केवळ 4 किलोमीटर अंतर चालते. सहाजिकच एलएनजी आणि सीएनजी इंधन वापरल्यास इंधनावरील खर्चात बचत होऊन प्रदुषण कमी होण्यास मदत होणार आहे. पुढील वर्षीपासून घेण्यात येणाऱ्या नव्या 20 हजार बसेस हायब्रीड
इंधनावर चालणाऱ्या घेण्यात येणार आहेत.” असे सांगितले.
एलएनजी इंधनावर 20 टक्के सूट
एसटी महामंडळाने यापूर्वी किंग्ज गॅस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी सोबत केलेल्या करारानुसार एल.एन.जी.इंधन हे तत्कालीन डिझेल इंधनाच्या किमतीच्या 20% कमी दराने पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे सध्याच्या खर्चात दरवर्षी 235 कोटी रुपयांची बचत होणार आहे. राज्यभरात 90 ठिकाणी एल.एन.जी. चे पंप उभारले जाणार आहेत. तसेच महानगर गॅस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी द्वारे सी.एन.जी. चे 20 पंप उभारले जात आहेत. त्यामुळे भविष्यात इंधन पुरवठ्याची व्यवस्था होणार असून या दोन्ही इंधना सोबत डिझेल इंधनावर चालेल अशी हायब्रीड बसेस तयार करण्याचे प्रस्ताव बस मॅन्युफॅक्चर कंपन्या कडून मागविण्यात आले असून भविष्यात एसटीच्या तफ्यात या दोन इंधनावर चालणा-या हायब्रीड बसेस घेण्याचा एसटीचा मानस आहे असे मंत्री सरनाईक यांनी म्हटले आहे.
Comments are closed.