Sudhakar Badgujar will join BJP, but state president Chandrashekhar Bawankule is unaware


शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आलेले सुधाकर बडगुजर यांचा ताफा शेकडो कार्यकर्त्यांसह मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे. बडगुजर हे आज हजारो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. पण त्यांच्या प्रवेशाबाबत स्वतः प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना काही माहीत नसल्याची बातमी समोर आली आहे.

नाशिक : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाशकातील उपनेते सुधाकर बडगुजर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत हकालपट्टी करण्यात आली. बडगुजर यांच्यावर पक्षाकडून कारवाई होण्याच्या दोन दिवस आधी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती आणि या भेटीनंतरच त्यांच्यावर शिवसेना ठाकरे गटाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला. बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर ते नक्कीच भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. पण पक्षातील काही नेत्यांनी त्यांच्या पक्ष प्रवेशाला विरोध केला होता. त्यामुळे त्यांचा पक्ष प्रवेश होणार की नाही? असा प्रश्न निर्माण झाला होता. पण आज मंगळवारी (ता. 17 जून) बडगुजर आपल्या हजारो कार्यकर्त्यांसोबत भाजपात प्रवेश करणार आहेत. मात्र त्यांच्या या पक्ष प्रवेशाची भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाच काही माहिती नसल्याची बातमी समोर आली आहे. (Sudhakar Badgujar will join BJP, but state president Chandrashekhar Bawankule is unaware)

शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आलेले सुधाकर बडगुजर यांचा ताफा शेकडो कार्यकर्त्यांसह मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे. मंगळवारी सकाळी नाशिकमधील बडगुजर यांचे कार्यकर्ते हे बसने मुंबईसाठी रवाना झाले. आज दुपारी 1 वाजता मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात बडगुजर यांचा पक्षप्रवेश होणार आहे, याबाबतची माहिती स्वतः बडगुजर यांनी प्रसार माध्यमांना दिली. पक्षप्रवेश सोहळ्याकरिता निघण्यापूर्वी त्यांच्या कुटुंबांनी त्यांचे औक्षण सुद्धा केले. त्यानंतर बसेसमधून आणि काही वाहनांमधून बडगुजर यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने निघाले. पण बडगुडर यांची वाहने नाशिकमधून बाहेर पडत नाही तेच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या विधानामुळे या पक्षप्रवेशाबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

हेही वाचा… Maharashtra Politics : गजाभाऊंचे ऐकणार कोण?

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सकाळी नागपुरातून प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबाबत विचारणा करण्यात आली. तेव्हा ते म्हणाले की, सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही. जोपर्यंत स्थानिक टीम असते, पदाधिकारी, खासदार, आमदार त्यांच्याशी सल्लामसलत एकमत झाल्याशिवाय आमच्याकडे पक्षप्रवेश होत नाही. आमच्याकडे बडगुजरांच्या पक्षप्रवेशाला स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे. सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल मला कुठलीही माहिती नाही. नाशिकचे स्थानिक पदाधिकाऱ्यांचा या पक्षप्रवेशाला विरोध आहे. निवडणुकीच्या राजकारणात जेव्हा आपण एकमेकांच्या विरोधात लढतो आणि आता निवडणुकीला फक्त सहा महिने झाले आहे. त्यामुळे विरोधाची भावना असते. परिणामी नाशिकमध्ये बडगुजर यांच्याविषयी विरोधाची भावना आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले.

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनीच सुधाकर बडगुजर यांचा पक्षप्रवेश होणार असल्याबाबत काहीच माहिती नसल्याचे बोलल्या कारणाने आता या पक्षप्रवेशाबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे आता मोठे शक्तीप्रदर्शन करत नाशिकहून मुंबईला निघालेल्या सुधाकर बडगुजर यांचा आज भाजापमध्ये पक्षप्रवेश होऊ शकला नाही तर त्यांच्यासाठी ती मोठी नामुष्की ठरेल. त्यामुळे मुंबईत पोहोचल्यानंतर बडगुजर यांचा प्रवेश होणार की नाही आणि झालाच तर यामुळे भाजपाच्या गोटात काय खळबळ उडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



Source link

Comments are closed.