Vanchit bahujan aghadi attack on AIMIM Imtiaz Jaleel about Minister Sanjay Shirsat vs Jalil controversy
छत्रपती संभाजीनगर – वंचित बहुजन आघाडीने एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. वंचित बहुजन आघाडीने प्रश्न उपस्थित केला आहे की, “इम्तियाज जलील, आम्हाला ऐकायला मिळालंय की तुम्हाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सतत फोन येतात. हे खरे आहे का?” अशी पोस्ट वंचित बहुजन आघाडीने सोशल मीडियाच्या एक्स अकाऊंटवरुन केली आहे.
वंचित आघाडीचा आरोप आहे की, माजी खासदार इम्तियाज जलील हे छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना शिंदे गटाला संपवून भाजपसाठी राजकीय जागा मोकळी करण्याचं काम करत आहेत. “हे सगळं असदुद्दीन ओवैसी यांना माहिती आहे का? आणि छत्रपती संभाजीनगरमधील एमआयएमचे कार्यकर्ते या राजकीय सौद्याबाबत जागरूक आहेत का?” असाही थेट सवाल वंचित बहुजन आघाडीने उपस्थित केला आहे.
या आरोपांमुळे छत्रपती संभाजीनगरमधील राजकारणात खळबळ उडाली आहे. एआयएमआयएमकडून यावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. नुकतेच इम्तियाज जलील यांनी वंचित बहुजन आघाडीवर टीका केली होती. त्याला प्रतिउत्तर म्हणून वंचित बहुजन आघाडीने जोरदार हल्ला चढवला आहे.
.@Imtiaz_jaleel, सुनने में आया हैं की देवेंद्र फडणवीस के बहुत फ़ोन आते हैं आपको आजकल?
औरंगाबाद में शिंदे सेना को ख़त्म करके भाजपा के लिए जगह बनाने का कॉन्ट्रैक्ट लिया हैं आपने!
असदुद्दीन ओवैसी जी को पता है ये सब? औरंगाबाद में आपके कार्यकर्ता को पता है ये सब?#VBAForIndia pic.twitter.com/oUJUmaR1Lr
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) June 13, 2025
काय आहे जलील आणि शिरसाट वाद?
माजी खासदार इम्तियाज जलील हे समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. संजय शिरसाट यांनी शेंद्रा पंचतारांकित एमआयडीसीमध्ये पाच एकराचा भूखंड खरेदी केला आहे. मद्य निर्मिती कारखान्यासाठी त्यांनी या भूखंडाची खरेदी केली आहे. मात्र हा भूखंड ट्रक टर्मिनलसाठी आरक्षित होता. मंत्री शिरसाट यांचा मुलगा आणि आणि पत्नी संचालक असलेल्या कंपनीला भूखंड देण्यासाठी आरक्षण उठवण्यात आल्याचा आरोप माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केला.
खासदार जलील एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी संजय शिरसाट यांनी कुठे कुठे जमीनी खरेदी केल्या आहेत, त्यासाठीचे त्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत कोणते आहेत, याचा रोज उलगडा करत आहेत. संभाजीनगर शहरा लगत असलेल्या साजापूर येथे अनुसुचित जातीसाठी राखीव असलेला दहा एकराचा भूखंड शिरसाट यांच्या दोन्ही मुलांच्या नावावर करण्यात आला आहे, असाही आरोप जलील यांनी नुकताच केला.
एमआयएम नेते इम्तियाज जलील हे शिरसाटांवर रोज एक भ्रष्टाचाराचा आरोप करत आहेत. त्यांच्याया आरोपानंतर वंचित बहुजन आघाडीने त्यांना हे काम भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याचा गंभीर आरोप केला आहे. फडणवीसांचे जलील यांना रोज फोन येत आहेत. त्यांच्याच सांगण्यावरुन जलील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांच्यावर आरोप करत असल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर म्हणण्यात आले आहे. यावर जलील यांच्याकडून अद्याप उत्तर देण्यात आलेले नाही.
Comments are closed.