Vijay Wadettiwar criticizes Narendra Modi for US intervention leading to ceasefire between India and Pakistan
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 मे रोजी देशातील नागरिकांसोबत संवाद साधताना पाकिस्तानला इशारा दिला. मात्र यानंतर आता विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर टीका करताना दिसत आहेत. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनीही मोदींवर निशाणा साधला आहे.
नागपूर : ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरच्या 9 दहशतवादी तळांवर हल्ला केल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. पण अमेरिकेच्या कथित हस्तक्षेपानंतर दोन्ही देशांत 10 मे रोजी शस्त्रसंधी झाली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 मे रोजी देशातील नागरिकांसोबत संवाद साधताना पाकिस्तानला इशारा दिला. मात्र यानंतर आता विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर टीका करताना दिसत आहेत. (Vijay Wadettiwar criticizes Narendra Modi for US intervention leading to ceasefire between India and Pakistan)
नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांना भारत अमेरिकेपुढे झुकला का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, निवडणुकापूर्वी सत्तेत येण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या ताकदीने बोलले होते, त्याच पद्धतीने बोलावे अशी अपेक्षा भारतीयांची होती. पण आता जनतेत विश्वासावरून विश्वासघाताची भावना वाढायला लागली आहे. आपले सैन्य इतके ताकदवर असताना अमेरिकासमोर झुकण्याची गरज काय होती? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात अमेरिकेपुढे आम्ही झुकणार नाही, असे वाक्य आले असते तर बरे वाटले असते. परंतु पंतप्रधान वारंवार भाषणात पाकिस्तानचे नाव घेत होते. पण त्या चिल्लर देशाला एवढा भाव देण्याची गरज काय होती? खरं तर पंतप्रधानांचे सोमवारचे भाषण अमेरिकेला इशारा देणारे असायला पाहिजे होते, अशी भूमिका विजय वडेट्टीवार यांनी मांडली.
हेही वाचा – OPERATION SINDOOR : पाकिस्तान अजूनही खरे बोलेना, भारताच्या हल्ल्यात 11 सैनिक ठार झाल्याची दिली माहिती
पंतप्रधानांच्या भाषणात निराशा आणि हतबलता
विजय वडेट्टीवार म्हणाले की, पहिले डोनाल्ड ट्रम्प यांचे भाषण झाले. त्यानंतर आमच्या देशाचे पंतप्रधानाचे भाषण झाले. खरं तर आपले सैन्य ताकतवर असल्याने आपण पाकिस्तानात घुसायला पाहिजे होते. सैन्यांना अधिकार दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या निर्णयावर ठाम राहायला पाहिजे होते. परंतु पंतप्रधानांच्या सोमवारच्या भाषणात निराशा आणि हतबलता दिसली, अशी घणाघाती टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.
हेही वाचा – Thackeray Group : ठाकरे गटाला उत्तर मुंबईत मोठा धक्का, कौटुंबिक संबंध असलेल्या महिला नेत्याचा पक्षाला रामराम
Comments are closed.