टेबल टेनिस मध्ये महाराष्ट्राच्या स्वस्तिका घोषची दोन पदके निश्चित

डेहराडून: 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या स्वस्तिका घोष हिने एकेरीतील उपांत्य फेरीत तर दुहेरीत दिया चितळे हिच्या साथीत अंतिम फेरीत स्थान मिळवित दोन पदके निश्चित केली. या स्पर्धेतील पदार्पणातच महाराष्ट्राची उदयोन्मुख खेळाडू पृथा वर्टीकर तिने उपांत्य फेरीत प्रवेश करीत आपलेही पदक निश्चित केले.

महिलांच्या गटात स्वस्तिका घोष हिने एकेरीतील विजय वाटचाल कायम ठेवताना पश्चिम बंगालच्या पायमंती बैस्या हिचा पराभव केला आणि उपांत्य फेरीतील प्रवेशासह आपले पदक निश्चित केले. उत्कंठापूर्ण लढतीत तिने १०-१२, ११-८, ११-४, ११-८ असा विजय मिळविला. पहिली गेम गमावल्यानंतर तिने टॉप स्पिन फटके आणि प्लेसिंग असा खेळ करीत उर्वरित तीनही गेम्स घेतल्या. उपउपांत्यपूर्व फेरीत तिने तामिळनाडूच्या एम. नित्याश्री हिचे आव्हान संपुष्टात आणले होते.

दुहेरी मध्ये स्वस्तिका व दिया यांनी पश्चिम बंगालच्या कौशिनी नाथ व प्रिपाती सेन यांचे आव्हान ९-११, ७-११, ११-५, १२-१०, ११-८ असे संपुष्टात आणले. सकाळच्या सत्रात दिया हिचा खांदा दुखावला होता. मात्र, दुहेरीच्या सामन्यात तिने त्याचा लवलेश न दाखवता स्वस्तिकाच्या साथीत सुरेख खेळ केला. या जोडीने पहिल्या दोन गेम्स गमावल्यानंतर खेळावर नियंत्रण मिळवीत उर्वरित तीनही गेम्स घेतल्या आणि अंतिम फेरीकडे आगेकूच केली.

पृथा हिने उपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्राच्याच सायली वाणी हिच्यावर ११-८, ११-७, ११-८ अशी सरळ तीन गेम्स मध्ये मात केली. तिने या लढतीत काऊंटर अटॅक पद्धतीचा खेळ केला. तसेच प्लेसिंगचाही कल्पकतेने उपयोग केला. या स्पर्धेमध्ये तिला भारतीय टेबल टेनिस महासंघातर्फे विशेष प्रवेशिका देण्यात आली आहे.

सकाळच्या सत्रात अग्रमानंकित दिया चितळे हिला खांदा दुखावल्यामुळे पृथा वर्टीकर या आपल्या कनिष्ठ सहकारी खेळाडूविरुद्ध माघार घ्यावी लागली. चुरशीने झालेल्या या सामन्यातील पहिली गेम दिया हिने ११-५ अशी घेतली मात्र पृथाने ११-८ अशी घेत सामन्यातील उत्कंठा वाढवली. तथापि पुन्हा दियाने ११-७ अशी तिसरी गेम घेत दोन एक अशी आघाडी घेतली. चौथ्या गेम मध्ये तिने ६-१ अशी भक्कम आघाडी देखील मिळवली होती. मात्र, तेथून टॉप स्पीन फटके व चॉप्सचा उपयोग करत पृथाने ही गेम १३-११ अशी घेत सामन्यात दोन-दोन अशी बरोबरी साधली. ही गेम सुरू असताना दिया हिच्या उजव्या खांद्यात वेदना सुरू झाल्या‌. तात्पुरते उपचार करीत तिने चौथी गेम खेळली. पाचव्या गेममध्ये पृथाकडे २-० अशी आघाडी असताना दिया हिने दुखापतीच्या कारणास्तव सामना सोडून दिला.

पुरुषांच्या दुहेरीत सिद्धेश व रीगन यांना कास्यपदक
पुरुषांच्या दुहेरीत महाराष्ट्राच्या सिद्धेश पांडे व रीगन अल्बुकर्क या जोडीला उपांत्य फेरीतच पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे त्यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागणार आहे. त्यांना तामिळनाडूच्या साथियन ज्ञानेश्वरन व अमलराज ॲंथोनी यांच्याकडून ११-४, ७-११, १२-१४, ९-११ असा पराभव पत्करावा लागला. महाराष्ट्राच्या जोडीने पहिली गेम घेतली. मात्र, नंतर त्यांना अपेक्षेइतके सातत्य ठेवता आले नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

ॲथलेटिक्समध्ये संजीवनी जाधवला रौप्यपदक
ICC ची कठोर कारवाई, शाहीन आफ्रिदीसह पाकिस्तानच्या 3 खेळाडूंना शिक्षा!
ज्युदोत पुण्याच्या आदित्य परबला कांस्य

Comments are closed.