पिंपरी चिंचवडमध्ये प्रारूप मतदार याद्या जाळल्या; महाविकास आघाडीचे आक्रमक आंदोलन

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांत मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचा आरोप करत आज महाविकास आघाडीने जोरदार आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी प्रारूप मतदार याद्यांच्या प्रती जाळून निषेध व्यक्त केला.

महाविकास आघाडीचे कार्यकर्ते म्हणाले की, महापालिकेने 20 तारखेला प्रसिद्ध झालेल्या याद्यांवर हरकतीसाठी फक्त सात दिवसांची मुदत दिली असून, अनेक प्रभागांमध्ये गंभीर चुका आढळत आहेत. प्रभाग 26 चे उदाहरण देत त्यांनी सांगितले की, सौदागर, वाकड, तातवडे आदी भागातील एकूण 19 याद्या चुकीच्या पद्धतीने समाविष्ट करण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये 16 हजार मतदार त्याच प्रभागात असूनही याद्यांमध्ये प्रतिबिंबित नाहीत.

महाविकास आघाडीने आरोप केला की, महानगरपालिकेचे प्रशासन आणि निवडणूक आयोगाचे यंत्रणा भाजपच्या सांगण्यावर काम करत आहे. लोकशाही संपवून हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.”प्रभाग क्रमांक 14 मध्ये आयोगाने 56 हजार लोकसंख्या दाखवली असताना मतदारसंख्या 57 हजार असल्याचे सांगितले आहे, जे पूर्णपणे चुकीचे कॅल्क्युलेशन आहे.

प्रारूप मतदारयाद्यांमध्ये सुधारणा होईपर्यंत कोणतीही निवडणूक घेऊ नये. याद्या दुरुस्त झाल्यावरच निवडणुकांची घोषणा करावी. तसेच, राहुल गांधी यांनी मांडलेल्या मतदार चोरीच्या आरोपांचे प्रत्यंतर येथे दिसत असल्याचे म्हटले असून, भाजपलाही हे मान्य असेल तर त्यांनी याद्या पुन्हा तयार करून निवडणुका जाहीर कराव्यात, अशी मागणीही महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केली.

Comments are closed.