महाविकास आघाडीचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार, भास्कर जाधव यांची माहिती

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी सरकारकडून आयोजित चहापानावर  बहिष्कार घालण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटनेते भास्कर जाधव, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, सतेज पाटील यांनी एकत्रितरित्या एक पत्रकार परिषदत घेतली. यावेळी भास्कर जाधव यांनी महाविकास आघाडीने सरकारच्या चहापानावर बहिष्कार घातल्याची माहिती दिली.

एका जबाबदार मंत्र्याच्या जिल्ह्यात ड्रग्ज फॅक्टरी मिळाली. त्यावर कारवाई झाली नाही. अशा सरकारच्या चहापानाला का जायचं? एका बाजूला विरोधकांना चहा पाजायचा आणि दुसऱ्या बाजूला या देशाच्या भावी पिढीला ड्रग्ज पाजायचे असा विरोधाभास असल्याने आम्ही या सरकारच्या चहापानाला जाणार नाही, असे भास्कर जाधव यांनी सांगितले.

उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन

राज्यात वाढलेल्या अत्याचाराच्या घटना, घोटाळ्यांचे ‘पीक’, मंत्रालयातील लाचखोरी, रद्द झालेले मुस्लिम आरक्षण, बिघडलेली कायदा-सुव्यवस्था, मेट्रो दुर्घटना आणि तिजोरीतील ठणठणाटामुळे लटकणारी शेतकरी कर्जमाफी अशा आव्हानांमुळे सोमवारपासून सुरू होणारे विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सरकारसाठी ‘अग्निपरीक्षा’च ठरणार आहे. सत्ताधारी कारभार करताना सर्वच पातळीवर अपयशी ठरल्यामुळे विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी रणनीती आखली आहे. त्यामुळे सरकारला अर्थसंकल्पीय अधिवेशन चांगलेच ‘भारी’ पडणार आहे.

Comments are closed.