धोनी है आयपीएल के लिए! आगामी आयपीएलमध्येही खेळण्याचे दिले संकेत

चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आलीय. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आगामी आयपीएलमध्ये खेळण्याचे संकेत दिले आहेत. यावेळी त्याने संघाचे नेतृत्व स्वतःकडे न ठेवता ऋतुराज गायकवाडच्या कर्णधारपदाखाली खेळण्याची तयारी दर्शवली आहे. 2025 च्या आयपीएलमध्ये गायकवाडने दुखापतीमुळे माघार घेतल्यानंतर पूर्ण मोसम धोनीने नेतृत्व सांभाळले होते.
गेली चार-पाच वर्षे सातत्याने आयपीएलमधून धोनी निवृत्त कधी होणार हा टीआरपी असलेल्या प्रश्नाचा त्याच्यावर वारंवार हल्ला केला जातोय आणि तो नेहमीच शांतपणे त्या प्रश्नाला उत्तर देतोय. आताही एका कार्यक्रमात धोनीने स्पष्ट केले की, मी अजून निवृत्तीचा निर्णय घेतलेला नाही. आगामी 6-8 महिन्यांत माझ्या फिटनेसनुसार निर्णय घेईन, मात्र संघासाठी खेळण्याची इच्छा आहे. नेतृत्व गायकवाडकडेच राहील.
गेल्या आयपीएलमध्ये गायकवाडच्या नेतृत्वाखाली चेन्नईच्या कामगिरीत सातत्य नव्हते, पण धोनीने त्याच्यावर विश्वास कायम ठेवत त्याला पुढील मोसमातही कर्णधार राहण्याचे पूर्ण संकेत दिले आहेत. धोनीच्या या सकारात्मक संकेतामुळे धोनी है आयपीएल के लिए हे पुन्हा सिद्ध झालेय. त्याचे आयपीएलबद्दलचे प्रेम 2026 मध्येही पाहायला मिळणार, हे जवळजवळ निश्चितच मानले जात आहे. तसेच आयपीएलमध्ये धोनीची प्रचंड लोकप्रियता असल्याचे वारंवार दिसले आहे. त्याच्या फलंदाजीत पहिल्यासारखा जोर नसला तरी तो यष्टीमागे चपळ यष्टीरक्षण करत असल्याचे दिसतेय.
Comments are closed.