अवतीभवती – वर्धेचा गोरस पाक

>> महेश अपडेव्ह

राष्ट्रपिता महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या वर्धा शहराला देशात मोठे महत्त्व आहे. या दोघांबरोबर जमनालाल बजाज यांनी गरीब शेतकऱयांच्या उत्कर्षासाठी गो संवर्धनाचा सल्ला शेतकऱयांना दिला. गाईच्या दुधापासून तयार झालेल्या गोरस पाक या पदार्थाला देश-विदेशातून मागणी आहे. 1939 मध्ये या महान व्यक्तीनी गोसंवर्धन संस्था स्थापन केली. जमनालाल बजाज यांना विविध देशी जातींच्या गाई पाळण्याचा छंद होता. शेतकऱयांना पर्यायी व्यवसाय करता यावा म्हणून त्यांनी गोपालन कल्पना अमलात आणली. 1941 मध्ये गोसेवा संघाचा एक भाग म्हणून कार्यरत,12 नोव्हेंबर 1961 मध्ये ही संस्था सहकारी तत्त्वावर नोंदणीकृत झाली. या संस्थेचा उद्देश म्हणजे गोसंवर्धन, प्रचार, प्रसार व दूध उत्पादक शेतकऱयांचा विकास, कोणाकडून आर्थिक सहाय्य न मिळता ना नफा ना तोटा या तत्त्वावर कार्यरत असून इतकी वर्षे संस्था कार्यरत आहे. संस्थेचे उत्पादन गोरस पाक, दूध, बासुंदी, श्रीखंड आणि गाईच्या दुधापासून तयार झालेल्या पेढय़ाला महाराष्ट्राबरोबर देशात खूप मोठय़ा प्रमाणात मागणी आहे. गोरस पाक शुद्ध गाईचे तूप, खवा, गव्हाची कणिक, ड्राय फूटपासून हाताने तयार केला जातो. रोज 250 ते 300 किलो गोरस पाक हाताने तयार केला जातो. वैशिष्टय़ म्हणजे लाकडाच्या चुलीवर तयार केल्यामुळे गोरस पाकला एक वेगळी चव आहे. शुद्ध गाईच्या दुधाचा वापर याकरिता केला जातो, बाहेरून खवा आणि दूध आणून हा पदार्थ तयार करण्याचा आम्ही प्रयत्न केला, पण त्याला चव आली नाही, असे गोरस भंडारचे अध्यक्ष नरेश पाटील यांनी सांगितले. गोरस पाक तोंडात ठेवल्या ठेवल्या विरघळला जातो. गोरस पाकची निर्मिती बलवंतसिंग आर्य यांनी प्रथम केली. त्यानंतर गोरस पाक हा कुकीजमध्ये मोडणारा पदार्थ खूपच लोकप्रिय झाला. हिंदुस्थानच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांना गोरस पाक फार आवडायचा. खास वर्धा येथून त्या गोरस पाक मागवून घ्यायच्या. रोज 9 हजार ते 12 हजार लिटर दूध शेतकरी आणून देतात. त्यापैकी 6 हजार लिटर दूध विकल्यानंतर उर्वरित दुधाचे पदार्थ तयार करण्यात येतात. गाईच्या दुधापासून तयार झालेल्या खव्याचा पेढा एकदम उत्कृष्ट असून त्याला मोठय़ा प्रमाणात मागणी आहे. सेवाग्राम येथील गांधी ग्रामला भेट देण्यासाठी आलेले पाहुणे खास करून गोरस पाक व पेढा आठवणीने घेऊन जातात. वर्धेला अथवा सेवाग्रामला बापूंच्या कुटीस भेट देणाऱया व्यक्तीने आवर्जून गोरस पाकाची चव चाखायलाच हवी.

Comments are closed.