Main accused Abhay Kurundkar sentenced to life imprisonment
मुंबई : बहुचर्चित सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याला पनवेल सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा तसेच 20 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर, सहआरोपी कुंदन भंडारी आणि महेश फाळणीकर या दोघांना प्रत्येकी सात वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. मात्र, या दोघांच्या शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे या दोघांची सुटका करण्यात येणार आहे. तर अन्य संशयित राजू पाटील याची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. तथापि, अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा न देता फाशीची शिक्षा द्यावी यासाठी फेरयाचिका दाखल केली आहे. (Ashwini Bidre Case: Main accused Abhay Kurundkar sentenced to life imprisonment)
अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी नऊ वर्षानंतर आरोपींना शिक्षा ठोठावण्यात आली आहे. न्यायाधीश के. जी. पालदेवार यांनी या प्रकरणातील चार आरोपींपैकी प्रमुख आरोपी बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरला 5 एप्रिल 2025 रोजी दोषी ठरवले होते. तर, उर्वरित कुंदन भंडारी आणि महेश फाळणीकर या दोघांनी कुरुंदकर याला मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास त्याला मदत केल्याने त्यांचा सहभाग असल्याचे न्यायालयाने निकाल देताना स्पष्ट केले होते. तथापि, या प्रकरणातील अन्य आरोपी आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा राजू पाटील याने चुकीच्या कार्यात मदत केली असली तरी त्याबाबतचे कोणतेही पुरावे सादर करण्यात न आल्याने सबळ पुराव्या अभावी त्याची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती.
हेही वाचा – Thackeray and Thackeray : भाजपा, एसंशिंकडून राज यांच्या खांद्याचा वापर, उद्धव ठाकरेंचा आरोप
अश्विनी बेपत्ता असल्याचा गुन्हा 31 जानेवारी 2017 रोजी कळंबोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. मागील सुनावणीत न्यायालयाने तत्कालिन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर कडक ताशेरे ओढले होते. अश्विनी बिद्रे यांची हत्या झाल्यानंतर सर्च ऑपरेशन दोन वर्षांनी करण्यात आले. आरोपींचे मोबाइल एक वर्षांनी ताब्यात घेण्यात आले. आरोपी अभय कुरूंदकर हा क्रमांक एकचा आरोपी असतानाही त्याचे नाव राष्ट्रपती पदासाठी दिले जाते, ही बाब गंभीर असल्याचे न्यायालयाने म्हटले होते. या प्रकरणाच्या तपासात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केला असल्याचा ठपकाही न्यायालयाकडून ठेवण्यात आला होता.
काय आहे प्रकरण?
कोल्हापूरच्या रहिवासी असलेल्या अश्विनी बिद्रे यांचे 2005 साली राजू गोरे यांच्याशी लग्न झाले. नंतर सांगलीत पोस्टिंग असताना अश्विनी यांची ओळख अभय कुरुंदकरशी झाली. पुढे दोघांत अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. पत्नीला घटस्फोट देऊन लग्न करण्याचे वचन कुरुंदकरने दिल्याने अश्विनी बिद्रे यांनी राजू गोरेसोबतचे संबंध तोडले. यानंतर अश्विनी यांनी अभय कुरूंदकरकडे लग्नाचा तगादा लावला. मात्र, कुरूंदकरला अश्विनीशी लग्न करायचे नव्हते. त्यावरुनच कुरुंदकर आणि बिद्रे यांच्यात रोजच भांडणे होत होती. एकदाची कटकट संपवावी म्हणून कुरुंदकरने अश्विनी यांची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी बालपणीचा मित्र महेश फळणीकर, राजू पाटील तसेच कारचालक कुंदन भंडारी यांनी साथ दिली.
हेही वाचा – Rohini Khadse on ECI : कोंबडं किती झाकलं तरी…, रोहिणी खडसेंचा निवडणूक आयोगावर निशाणा
Comments are closed.