मैथिली ठाकूर निवडणुकीच्या रणांगणात
भारतीय जनता पक्षाची दुसरी सूची घोषित, पास्वान यांच्याही 14 उमेदवारांची घोषणा, मतभेद संपुष्टात
वृत्तसंस्था / पाटणा
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपली दुसरी उमदेवार सूची घोषित केली आहे. सुप्रसिद्ध भजन गायिका मैथिली ठाकूर यांना अलिनगर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांनी मंगळवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. लोकजनशक्ती पक्षाचे चिराग पासवान यांनीही आपल्या पक्षाच्या 14 उमेदवारांची घोषण केली आहे. त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मतभेद संपुष्टात आल्याचे दिसून येत आहे. या आघाडीने आपल्या बहुतेक सर्व उमेदवारांची घोषणा केली असून ऊर्वरित उमेदवार आज गुरुवारी निश्चित होणार आहेत, अशी माहिती भारतीय जनता पक्षानकडून देण्यात आली.
भारतीय जनता पक्षाच्या दुसऱ्या सूचीत 12 उमेदवारांची नावे आहेत. त्यात मैथिली ठाकूर यांचे नाव प्रमुख आहे. तसेच आयपीएस अधिकारी आनंद मिश्रा यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाने आपल्या प्रथम सूचीत 71 उमेदवारांची नावे घोषित केली होती. आता आणखी 12 उमेदवारांची भर पडली आहे. अशा प्रकारे या पक्षाने त्याला देण्यात आलेल्या 101 जागांपैकी 83 जागांवर उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या या सूचीत 10 नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे. छोटी कुमारी यांच्यासह आरक्षित जागांवरील उमेदवारांच्या नावांचीही घोषणा करण्यात आली आहे.
आरक्षित जागांवरील उमेदवार
रोडसा मतदारसंघातून वीरेंद्र कुमार आणि अगिआव मतदारसंघातून महेश पासवान यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. कुसुम देवी या विद्यामान आमदारांचे तिकिट काटण्यात आले आहे. त्यांच्या स्थानी गोपालगंज मतदारसंघातून सुभाष सिंग यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच बाढ मतदारसंघातून ज्ञानेंद्र सिंग ज्ञानू यांना उमेदवारी नाकारण्यात आली असून त्यांच्या स्थानी सियाराम सिंह यांना संधी देण्यात आली आहे. मुजफ्फरपूर मतदारसंघातून सुरेश शर्मा यांच्या स्थानी रंजन कुमार यांना आणण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली.
लोकजनशक्तीचे 14 उमेदवार घोषित
चिराग पासवान यांनी आपल्या लोकजनशक्ती पक्षाच्या 14 उमेदवारांची नावे घोषित केली आहेत. राजू तिवारी यांना गोविंदगंज मतदारसंघातून संधी देण्यात आली आहे. तर सिमरी बख्तीयारपूरमधून संजय कुमार सिंग तसेच दारौलीतून विष्णू देव पासवान यांना उतरविण्यात आले आहे. सीमांत मृणाल, सुरेंद्र कुमार आणि बाबूलाल शौर्य यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे.
महागठबंधनमध्ये शांतता
राष्ट्रीय लोकशाही आघाडीने आपले बहुसंख्य उमेदवार घोषित केलेले असताना विरोधी महागठबंधनमध्ये मात्र अद्यापही फारशी हालचाल दिसून येत नाही. या आघाडीचे जागावाटप अद्याप झालेले नाही. तसेच कोणत्या मतदारसंघांमध्ये कोणत्या पक्षाने लढायचे, याचाही निश्चित निर्णय झालेला नाही, अशी माहिती आहे. प्रथम टप्प्यातील मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज सादर करण्यास प्रारंभ झाला आहे. पहिल्या टप्याचे अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक 17 ऑक्टोबर हा आहे. महागठबंधनचे जागावाटप झालेले नसतानाच या आघाडीचे नेते तेजस्वी यादव यांनी आपला उमेदवारी अर्ज राघोपूर या मतदारसंघातून सादर केला आहे. अर्ज सादर करण्याच्या प्रसंगी त्यांचे पिता आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव आणि माता राबडीदेवी हे नेते उपस्थित होते. महागठबंधनचे जागावाटप गुरुवारी निश्चित होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. काँग्रेसला यावेळी कमी जागांवर समाधान मानावे लागेल, अशी स्थिती आहे. तर राष्ट्रीय जनता दल सर्वाधिक जागांवर लढणार आहे. डाव्या पक्षांनाही अधिक उमेदवारी मिळू शकते.
भाजपकडून विजयाचा विश्वास
बिहारच्या या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला दोन तृतियांशापेक्षा अधिक बहुमत मिळेल, असा विश्वास भारतीय जनता पक्षाने व्यक्त केला आहे. गेली जवळपास 20 वर्षे या आघाडीने बिहारला एक विकासाभिमुख सरकार देण्यात यश मिळविले आहे. आमच्या सरकारने राज्यातील संघटित गुन्हेगारी पूर्णत: नियंत्रणात आणली आहे. तसेच कृषी क्षेत्र आणि औद्योगिक विकासातही मोठी प्रगती केली आहे. बिहारची जनता लालू प्रसाद यादव यांच्या काळातले अत्याचार विसरलेली नाही. त्यामुळे लोक महागठबंधन या आघाडीला कधीही सत्तेवर आणणार नाहीत. ते बहुसंख्येने राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्याच पाठीशी उभे राहतील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी केले आहे. राज्यातील वातावरण आमच्या आघाडीला अनुकूल असल्याचा प्रत्यय जागोजागी येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वात आम्ही घवघवीत यश मिळवणार आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
Comments are closed.