मैथिली ठाकूर कदाचित अलिनगरकडून स्पर्धा करू शकेल

भाजपकडून संधी मिळणार

सर्कल संस्था/ दरभंगा

बिहार निवडणुकीवरून पूर्ण राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अलिकडेच सुप्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूरने भाजप नेत्यांची भेट घेतली आहे. यामुळे भाजप मैथिलीला मधुबनी किंवा दरभंगाच्या एखाद्या मतदारसंघाची उमेदवारी देणार असल्याची चर्चा जोर पकडू लागली आहे. भाजप नेत्यांची भेट घेतल्यावर लोकगायिका मैथिलीने मंगळवारी स्वत:चे गृहक्षेत्र बेनीपट्टीमधून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

बेनीपट्टीशी माझा वेगळाच संबंध आहे आणि जर मी स्वत:ची राजकीय कारकीर्द येथून सुरू करू शकले तर खूप काही शिकता येणार असल्याचे तिने म्हटले आहे. मैथिलीने काही दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय महासचिव आणि बिहारमधील पक्ष संघटनेचे प्रभारी विनोद तावडे आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांची भेट घेतली होती. तेव्हापासून ती निवडणूक लढविणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

बेनीपट्टीची उमेदवारी अवघड

मैथिलीने बेनीपट्टीमधून (मधुबनी) निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली असली तरीही येथील वर्तमान आमदार विनोद नारायण झा यांना उमेदवारी नाकारणे भाजपसाठी सोपे नाही. यामुळे भाजप मैथिलीला दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर मतदारसंघाची उमेदवारी देणार असल्याचे समजते. विनोद नारायण झा हे जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाच्या काळापासून भाजपशी जोडलेले आहेत. तसेच ते भाजपचे दिवंगत नेते सुशील कुमार मोदी यांचे निकटवर्तीय राहिले आहेत. बेनीपट्टी मतदारसंघातून ते दोनवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. झा हे सध्या 68 वर्षांचे असल्याने वयाचा निकषही त्यांना उमेदवारी नाकारण्यासाठी लागू पडणार नाही.

मतदारसंघातील जातीय समीकरण

बेनीपट्टी मतदारसंघात ब्राह्मण मतदारांचा दबदबा असल्याचे मानले जाते. ब्राह्मण मतदारांनंतर यादव मतपेढी महत्त्वाची मानले जाते. मागील निवडणुकीत झा यांनी काँग्रेसच्या उमेदवार भावना झा यांना चुरशीच्या लढतीत पराभूत केले होते. परंतु 2015 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या भावना झा विजयी झाली होती.

अलीनगरमधून संधी

बेनीपट्टीचे आमदार विनोद नारायण झा यांना उमेदवारी नाकारत मैथिलीला संधी देणे भाजपसाठी अडचणीचे ठरू शकते. अलीनगर मतदारसंघात भाजपचे मिश्रीलाल यादव हे वर्तमान आमदार आहेत. यादव यांच्यावर बंडखोरीचे आरोप झाले आहेत. मिश्रीलाल यादव यांनी मागील निवडणूक मुकेश सहनी यांच्या पक्षाच्या वतीने लढविली होती. परंतु मुकेश सहनी रालोआतून बाहेर पडल्यावर यादव भाजपमध्ये परतले होते. मैथिलीला मिथिलांचलचा प्रभावशाली चेहरा म्हणून ओळखले जाते. मैथिली आणि भोजपुरी सारख्या स्थानिक भाषांमध्ये लोकगीत, पारंपरिक भजन आणि छठ गीत गाऊन तिने लाखो लोकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. मैथिली ठाकूर ही सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे. अलीनगर मतदारसंघातही ब्राह्मण मतपेढी मजबूत आहे. या मतदारसंघात भाजपला एका स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवाराचा शोध आहे, मैथिलीला उमेदवारी दिल्यावर  येथे ओबीसी, दलित आणि अन्य जातींच्या मतदारांवरही चांगला प्रभाव पडू शकतो.

Comments are closed.