लॉरेन्स बिश्नोई टोळीवर दिल्लीत मोठी कारवाई

बवाना येथे चकमक : तीन वॉन्टेड शूटर्सना अटक : संशयिताच्या पायाला लागली गोळी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्ली पोलीस आणि लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या तीन शूटर्समध्ये रविवारी दिल्लीत चकमक झाली. बवाना मुल्क कालव्याजवळ झालेल्या चकमकीनंतर आउटर नॉर्थ डिस्ट्रिक्ट बवाना पोलीस स्थानकाच्या पथकाने तीन शूटर्सना अटक केली. चकमकीदरम्यान एका संशयिताच्या पायाला गोळी लागली. या चकमकीदरम्यान दोन्ही बाजूंनी चार गोळ्या झाडण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

अटक करण्यात आलेल्या वॉन्टेड गुन्हेगारांनी तीन दिवसांपूर्वी बवाना परिसरात एका व्यावसायिकाचा पाठलाग करून गोळ्या झाडून हत्या केली होती. या घटनेनंतर लॉरेन्स टोळीतील रणदीप मलिक आणि अनिल पंडित यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून घटनेची जबाबदारी स्वीकारली होती. त्यापासून संबंधितांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू करण्यात आला होता. यापूर्वी गेल्या महिन्यात उत्तर दिल्लीतील बुरारी भागात झालेल्या चकमकीत लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या दोन शार्पशूटर्सना अटक करण्यात आली होती.

अटक केलेल्या शूटर्सची चौकशी सुरू

एन्काउंटरनंतर अटक केलेल्या तीन शूटर्सची चौकशी सुरू आहे. व्यावसायिकाच्या हत्येमागील कारणे काय होती आणि ‘सुपारी’ कोणी दिली होती? याबाबत माहिती मिळविली जात आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये कार्यरत असलेल्या लॉरेन्स बिश्नोई टोळीत इतर किती सदस्यांचा सहभाग आहे? कोणत्या शूटर्सना कोणत्या लक्ष्यांवर नियुक्त केले होते? अशा सर्व कोनातून पोलीस पथक तपास करत आहे.

Comments are closed.