चीन सीमेजवळ हिंदुस्थानविरुद्धचा मोठा कट उघडकीस, दोन काश्मिरी हेरांना अटक; पाकला पुरवत होते गुप्त माहिती

अरुणाचल प्रदेश पोलिसांनी चीनच्या सीमेजवळील भागात हेरगिरीच्या एका मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. जम्मू-कश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील दोन व्यक्तींना पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
अटक केलेल्या दोघांची नावे एजाज अहमद भट आणि बशीर अहमद गनाई अशी आहेत. हे दोघे १८ डिसेंबर रोजी कुपवाड्यातून अटक करण्यात आले आणि नंतर अरुणाचल प्रदेशात आणण्यात आले. सध्या ते पोलीस कोठडीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे आरोपी कंबल विकण्याच्या आड हेरगिरी करत होते. ते अरुणाचल प्रदेशाच्या विविध भागांत फिरून संवेदनशील माहिती गोळा करत होते आणि ती पाकिस्तानातील आपल्या हँडलर्सना पाठवत होते. या प्रकरणाची सुरुवात २१ नोव्हेंबरला झाली, जेव्हा इटानगर पोलिसांनी नजीर अहमद मलिक आणि साबीर अहमद मीर यांना अटक केली. त्यानंतर हिलाल अहमद यालाही ताब्यात घेण्यात आले होते. याप्रकरणी अधिक तपास केला जात आहे.

Comments are closed.