ऑस्ट्रेलियाला धक्का, पण हिंदुस्थानला आनंद; कर्णधार हिली उपांत्य फेरीतून बाहेर पडण्याची शक्यता

महिला विश्वचषकाच्या उपांत्य फेरीपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. संघाची कर्णधार आणि मुख्य फलंदाज एलिसा हिलीचे हिंदुस्थानविरुद्धच्या उपांत्य फेरीतील खेळणे अनिश्चित दिसत आहे. हिलीला पोटरीच्या दुखापतीमुळे गेल्या दोन सामन्यांमध्ये विश्रांती घ्यावी लागली होती, आणि आता ती संपूर्णपणे तंदुरुस्त नसल्याचे संकेत आहेत.

22 ऑक्टोबरला इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात हिली मैदानात उतरली नव्हती. तिच्या अनुपस्थितीतही ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला, परंतु संघाच्या बॅटिंग लाईनअपमधील स्थैर्य आणि नेतृत्वाची उणीव स्पष्ट जाणवली. हिलीला ही दुखापत बांगलादेशविरुद्धच्या सामन्यानंतर सराव सत्रादरम्यान झाली होती.

या स्पर्धेत हिली जबरदस्त फॉर्मात होती. तिने हिंदुस्थान आणि बांगलादेशविरुद्ध शानदार शतपं झळकवून संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. विशेषतः हिंदुस्थानविरुद्धच्या गटसामन्यात तिने 107 चेंडूंत 142 धावांची तुफानी खेळी करून संघाला 331 धावांच्या विक्रमी लक्ष्याचा पाठलाग यशस्वीरीत्या पूर्ण करून दिला होता. त्या सामन्यात तिला सामनावीर घोषित करण्यात आलं होतं.

ऑस्ट्रेलियाच्या मुख्य प्रशिक्षक शेली निश्चे यांनी शनिवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विजयानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत हिलीच्या फिटनेसविषयी माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, हिली अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नाही, पण तिचं मूल्यांकन सुरू आहे. आम्हाला आशा आहे की, उपांत्य फेरीपूर्वी ती सावरून मैदानात उतरेल. मात्र अंतिम निर्णय नवी मुंबईत होणाऱ्या सामन्याच्या अगोदर घेतला जाईल. निश्चे पुढे म्हणाल्या, आमच्यासमोर मोठं आव्हान आहे. हिंदुस्थानचा संघ सध्या उत्कृष्ट फॉर्मात आहे आणि त्यांच्या खेळाडूंची कामगिरी सातत्यपूर्ण आहे. आम्हाला प्रत्येक गोष्ट परिपूर्ण ठेवावी लागेल.

हिंदुस्थानसाठी सकारात्मक बातमी

ही बातमी जरी ऑस्ट्रेलियासाठी चिंतेची असली तरी हिंदुस्थानी महिला संघासाठी ही एक दिलासादायक बाब आहे. एलिसा हिली ही ऑस्ट्रेलियाची सर्वात अनुभवी आणि आक्रमक फलंदाज मानली जाते. तिच्या अनुपस्थितीत संघाच्या फलंदाजीवर मोठा ताण येणार आहे. हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील साखळी सामना रोमांचक ठरला होता आणि आता उपांत्य फेरीतील लढत अधिकच उत्पंठावर्धक ठरणार आहे.

Comments are closed.