वर्ध्यात सरावादरम्यान मेजरकडून कनिष्ठ अधिकाऱ्यावर गोळीबार, अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू; चौकशी सुरू

वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील सेंट्रल अम्युनिशन डेपोमध्ये (CAD) शुक्रवारी पहाटे सराव फायरिंगदरम्यान एका लष्करी अधिकाऱ्याने आपल्या कनिष्ठ अधिकाऱ्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत सुभेदार मेजर ओम बहादूर खंड यांचा मृत्यू झाला असून मेजर मनन तिवारी यांना लष्कराने ताब्यात घेतले आहे. पुलगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागपूरपासून सुमारे 100 किमी अंतरावर असलेले पुलगाव येथील CAD हे आशियातील सर्वात मोठे दारुगोळ्याचे भांडार मानले जाते. एफआयआरमधील माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे नियमित सराव फायरिंग सुरू असताना मेजर तिवारी यांनी अचानक 5.56 मिमी INSAS रायफलमधून सुभेदार मेजर खंड यांच्यावर जवळून गोळीबार केला. त्यावेळी खंड हे फायरिंगनंतर रिकामे काडतुसे गोळा करत होते.

या घटनेचे प्रत्यक्षदर्शी असलेले लान्स नाईक बीर सिंग धामी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात, गोळीबार का करण्यात आला याची माहिती नसल्याचे सांगितले आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, गोळीबार अतिशय जवळून करण्यात आला असून खंड यांना अनेक गोळ्या लागल्या. गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेनंतर तेथील जवानांनी मेजर तिवारी यांना ताब्यात घेतले. सध्या ते लष्कराच्या ताब्यात असून चौकशीनंतर त्यांना वर्धा पोलिसांच्या स्वाधीन केले जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. सुरुवातीला पोलिसांना CAD परिसरात प्रवेश करण्यास परवानगी देण्यात आली नव्हती, असेही समोर आले आहे.

नागपूर येथील लष्करी प्रवक्ते ग्रुप कॅप्टन आर. कन्नन यांनी घटनेची पुष्टी केली असून “नियमित फायरिंग सरावादरम्यान ही घटना घडली. लष्कर आणि वर्धा पोलीस संयुक्तपणे तपास करत आहेत,” असे त्यांनी सांगितले.

मृत सुभेदार मेजर ओम बहादूर खंड हे डिफेन्स सिक्युरिटी कॉर्प्स (DSC) मध्ये कार्यरत होते. निवृत्त सैनिकांना पुनर्नियुक्ती देणाऱ्या या दलाकडून CADसारख्या संवेदनशील लष्करी ठिकाणांची सुरक्षा केली जाते.

दरम्यान, पुलगाव CADमध्ये यापूर्वीही गंभीर दुर्घटना घडल्या आहेत. 2016 मध्ये अँटी-टँक माईन्स ठेवलेल्या संरचनेत स्फोट होऊन लेफ्टनंट कर्नल दर्जाच्या अधिकाऱ्यासह 18 जणांचा मृत्यू झाला होता. तसेच जुन्या बॉम्ब निकामी करण्याच्या मोहिमेदरम्यानही काही कामगारांना जीव गमवावा लागला होता.

Comments are closed.