पुढे ममता दीदींनी मोठा संघटनात्मक फेरबदल
सयोनी घोष यांना केले साइडलाइन
वृत्तसंस्था/ कोलकाता
बंगालमध्ये निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेसमध्sय सुरू झालेल्या मोठ्या संकटादरम्यान ममता बॅनर्जी आता पक्षात मोठे बदल करत आहेत. त्यांनी निवडणुकीदरम्यान प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या सयोनी घोष यांना युवा मोर्चाच्या अध्यक्षपदावरून हटविले आणि ही जबाबदारी अर्णव बॅनर्जी यांना दिली आहे. सयोनी घोष या जादवपूरच्या खासदार असून त्यांना एक आठवड्यापूर्वीच युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी नेमण्यात आले होते.
ममता बॅनर्जी यांनी याचबरोबर पक्षाच्या महिला शाखेच्या अध्यक्षालाही बदलले आहे. यापूर्वी कोलकाता दक्षिणच्या खासदार माला रॉय या पदावर होत्या. आता ममतादीदींनी नाडिया जिल्ह्यातील कालीगंजच्या आमदार आलिफा अहमद यांना महिला शाखेच्या अध्यक्षपदी नियुक्त केले आहे. सयोनी आणि माला रॉय दोन्ही खासदार बंडखोर नेत्यांच्या गटात सामील झाल्या आहेत. तृणमूलचे बंडखोर खासदार सोमवारी लोकसभा अध्यक्षांना भेटून स्वत:च्या गटाला ‘खरा तृणमूल काँग्रेस’ घोषित करण्याचा दावा सादर करणार आहेत.
रालोआला सपोर्ट
खासदार संदीप बंधोपाध्याय देखील बंडखोर गटात सामील झाले आहेत. तृणमूलचे लोकसभेत 28 खासदार असून यातील 20 जण बंडखोर गटात सामील ओत. खासदार काकोली घोष यांनी आपला गट तृणमूल काँग्रेस असल्याचे निश्चित झाल्यावर आम्ही संसदेत रालोआ सरकारला समर्थन देऊ अशी घोषणाच यापूर्वी केली आहे.
अभिषेक यांच्यावर कृपादृष्टी कायम
विधानसभेत आमदारांच्या बंडानंतरच ममता बॅनर्जी यांनी 5 जून रोजी संघटन समितीत बदल केले होते. ममतादीदींनी प्रथम सर्व समित्या भंग करत एक नवी संरचना तयार केली होती. तर त्यांनी स्वत:चा भाचा अभिषेक बॅनर्जी यांना राष्ट्रीय महासचिव पदावर कायम ठेवले होते. तर ममतादीदींनी कुणाल घोष यांनी पक्षाच्या उत्तर कोलकाता संघटनेच्या अध्यक्षपदी नियुक्त केले आहे.ममता बॅनर्जी या तृणमूल काँग्रेसच्या काँग्रेसमधील विलीनीकरणाची घोषणा करणार असल्याचीही चर्चा आहे. तर पक्षाचे राज्यसभेतील खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी ही चर्चा फेटाळली आहे.
ममतादीदींना आणखी एक झटका
पक्षाचे 7 वेळचे आमदार आणि माजी मंत्री मानस भुइयां यांनी तृणमूल काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ज्या राजकीय मूल्यं आणि तत्वांमुळे पक्षात सामील झालो होतो, त्याचपासून तृणमूल काँग्रेस आता दूर होताना दिसून येत आहे. याचमुळे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे भुइयां यांनी म्हटले आहे. मानस हे आता स्वत:चा मूळ पक्ष म्हणजेच काँग्रेसमध्ये परत जाण्याची शक्यता आहे
Comments are closed.