IPL 2026: चेन्नई विरुद्धच्या सामन्यातून श्रेयस अय्यर बाहेर पडणार? पंजाब किंग्सच्या प्रशिक्षकांनी दिली मोठी अपडेट!

पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याच्या दुखापतीबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात त्याला दुखापत झाली होती. हाताला चेंडू लागला असूनही त्याने फलंदाजी सुरूच ठेवली होती. आता तो चेन्नई सुपर किंग्स (CSK) विरुद्धच्या सामन्यात खेळणार की नाही, यावर पंजाब किंग्सचे असिस्टंट कोच ब्रॅड हॅडिन यांनी माहिती दिली आहे.

हॅडिन यांनी स्पष्ट केले की, श्रेयस अय्यरला फ्रॅक्चर झालेले नाही, पण त्याच्या हाताला सूज आहे. टीम मॅनेजमेंटला आशा आहे की, शुक्रवारच्या सामन्यापर्यंत तो फिट होईल आणि चेन्नईविरुद्ध मैदानात उतरेल.

जर श्रेयस अय्यर फिट होऊ शकला नाही, तर पंजाबचे नेतृत्व कोण करणार हा मोठा प्रश्न असेल. अशा परिस्थितीत ‘बिग बॅश लीग’मध्ये कर्णधारपदाचा अनुभव असलेला मार्कस स्टॉइनिस एक पर्याय असू शकतो किंवा अर्शदीप सिंगकडेही ही जबाबदारी सोपवली जाऊ शकते.

चेन्नईविरुद्ध श्रेयसची आकडेवारी फारशी प्रभावी नाही. त्याने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध 15 डावांत 28.5 च्या सरासरीने 371 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याचा स्ट्राईक रेट 115.94 इतका कमी आहे. मात्र, त्याच्या संपूर्ण आयपीएल कारकिर्दीचा विचार केला तर 134 सामन्यांत त्याने 34.08 च्या सरासरीने 3,749 धावा केल्या आहेत. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 32 सामने झाले आहेत, ज्यामध्ये पंजाबने 16 वेळा विजय मिळवला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या 8 सामन्यांपैकी चेन्नईचा संघ पंजाबला केवळ एकदाच हरवू शकला आहे. त्यामुळे या सामन्यात पंजाबचे पारडे जड मानले जात आहे.

Comments are closed.