सपामध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता : राजभर
वरिष्ठ नेते रामगोपाल यादवांचा केला उल्लेख
वृत्तसंस्था/ लखनौ
पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील घडामोडींदरम्यान आता उत्तरप्रदेशच्या मंत्र्याने मोठा दावा केला आहे. योगी सरकारमध्ये कॅबिनेटमंत्री आणि सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांनी आगामी काळात समाजवादी पक्षात मोठी फूट पडणार असल्याचा दावा केला आहे.
पूर्ण समाजवादी पक्ष भाजपमध्ये सामील होण्यास तयार असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. राजभर यांनी स्वत:च्या वक्तव्यात समाजवादी पक्षाचे वरिष्ठ नेते रामगोपाल यादव यांचाही उल्लेख केला आहे. रामगोपाल यादव यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात रामगोपाल यादव यांनी काही नावांचा उल्लेख करत त्यांना स्वत:सोबत आणणार असल्याची बाब नमूद केली आहे. खाण घोटाळा, गोमती रिव्हर फ्रंट घोटाळ्याचा सूत्रधार कोण हे पूर्ण उत्तरप्रदेश जाणतो. कारवाईचा फास आवळला जात असल्याने समाजवादी पक्ष त्रस्त असल्याचा दावा राजभर यांनी केला आहे.
तर सप प्रवक्ते सुनील साजन यांनी राजभर यांच्या दाव्याला प्रत्युत्तर देत भाजप अन् त्याचे सहकारी बिथरले असल्याचा आरोप केला. यावेळी राजभर जिंकणार नाहीत आणि त्यांच्या पक्षाचा एकही आमदार निवडून येणार नाही. मागील निवडणुकीत समाजवादी पक्षाने पीडीएचा नारा देत भाजपचे संख्याबळ निम्म्यावर आणले होते आणि आता भाजपला राज्यातून हद्दपार करणार असल्याचा दावा साजन यांनी केला आहे.
Comments are closed.