टी20 वर्ल्ड कपपूर्वी पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठा फेरबदल! एका महत्त्वाच्या सदस्याची संघातून हकालपट्टी
पाकिस्तान क्रिकेट संघात वारंवार बदल होणे ही काही नवीन गोष्ट नाही. तिथे कधी कर्णधार बदलतो, तर कधी प्रशिक्षकावर कारवाई होते. आता 2026 च्या टी-20 विश्वचषकापूर्वी पाकिस्तान क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. संघाच्या हंगामी (Interim) मुख्य प्रशिक्षकाला पदावरून हटवण्यात आले आहे. आगामी मोठ्या स्पर्धेपूर्वी हा एक महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. विशेष म्हणजे, 2026 च्या टी-20 विश्वचषकात पाकिस्तान आपले सर्व सामने श्रीलंकेमध्ये खेळणार आहे.
पाकिस्तान कसोटी संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून अझहर महमूद यांचा कार्यकाळ संपला आहे. अझहर यांची यावर्षी जूनमध्ये हंगामी मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आणि त्यांचा करार मार्च 2026 पर्यंत होता. मात्र, मार्च 2026 पर्यंत पाकिस्तानचा एकही कसोटी सामना नसल्यामुळे, पीसीबी आणि अझहर महमूद यांनी परस्पर संमतीने हा कार्यकाळ संपवण्याचा निर्णय घेतला.
अझहर महमूद यांची 2024 मध्ये सर्व फॉरमॅटसाठी ‘सहाय्यक प्रशिक्षक’ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, जेणेकरून ते गॅरी कर्स्टन (मर्यादित षटके) आणि जेसन गिलेस्पी (कसोटी) यांना मदत करू शकतील.
‘क्रिकइन्फो’शी बोलताना अझहर महमूद म्हणाले, पीसीबीने माझी नियुक्ती एका ठराविक कालावधीसाठी केली होती, ज्या दरम्यान मी माझी जबाबदारी पूर्ण निष्ठेने आणि व्यावसायिक पद्धतीने पार पाडली. आता माझा करार संपला असून, मी पाकिस्तानी संघाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.
अझहर महमूद यांनी कसोटी 21 सामन्यांत 39 विकेट्स आणि 900 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर वनडेमध्ये 143 सामन्यांत 123 विकेट्स घेत आणि 1521 धावा केल्या आहेत. अझहर महमूद यांनी 2007 मध्ये पाकिस्तानसाठी आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
Comments are closed.