स्मिथ-स्टार्कची तगडी फौज अपयशी; इंग्लिश खेळाडूच्या वादळी खेळीने बिग बॅश लीगवर कोरलं नाव!

पर्थ स्क्रॉचर्स संघाने बिग बॅश लीगच्या अंतिम सामन्यात सिडनी सिक्सर्स संघाला नमवलं. चुरशीच्या अंतिम लढतीत दडपणाने न खेळता संयमी खेळी करत पर्थ स्क्रॉचर्स सिडनी सिक्सर्सचा पराभव केला आहे. स्टीव्हन स्मिथ (Steve Smith & mitchell Starc) आणि मिचेल स्टार्क या दिग्गजांचा समावेश असलेल्या सिडनी सिक्सर्स संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं.

इंग्लंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज डेव्हिड पायन (David pain) हा पर्थ स्क्रॉचर्सच्या विजयाचा शिल्पकार ठरला. काही दिवसांपूर्वीच आटोपलेल्या अ‍ॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा असा धुव्वा उडवला होता. इंग्लंड संघाच्या खेळावर, वर्तनावर, प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांच्या शैलीवर प्रचंड टीका झाली होती. त्या पार्श्वभूमीवर इंग्लंडच्या एका खेळाडूने पर्थ स्क्रॉचर्स या संघाला जिंकून दिलं हा विशेष योगायोग मानला जात आहे..

सिडनी सिक्सर्सने प्रथम फलंदाजी करताना 132 धावाच केल्या. अनुभवी स्टीव्हन स्मिथने 24 धावा केल्या. आरोन हार्डीने त्याला बाद केलं. जोश फिलीप 24 धावा करून तंबूत परतला. पर्थच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध गोलंदाजी करत सिडनी सिक्सर्सच्या फलंदाजांना बाद केलं. सिडनीच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. डेव्हिड पायनने 18 धावांच्या मोबदल्यात 3 विकेट्स पटकावल्या. झाय रिचर्डसनने 32 धावांत 3 विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली. त्याचबरोबर माहिली बिअर्डमनने 2 विकेट्स घेतल्या.

या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा फिन अ‍ॅलन आणि मिचेल मार्श यांनी 80 धावांची खणखणीत सलामी देत विजयाचा पाया रचला. 22 चेंडूत 4 चौकार आणि एका षटकारासह 36 धावा करून फिन बाद झाला. आरोन हार्डी 5 धावा करून तंबूत परतला. मिचेल मार्शने 44 धावांची खेळी केली. टी20 प्रकारात ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक जोश इंगलिसने 26 चेंडूत नाबाद 29 धावांची खेळी करत पर्थच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. पर्थ स्क्रॉचर्स संघाचं बिग बॅश स्पर्धेचं हे सहावं जेतेपद आहे.

डेव्हिड पायनला सामनावीर तर स्पर्धेत 381 धावा करणाऱ्या सॅम हार्परला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. अंतिम लढतीसाठी 55,018 एवढे चाहते उपस्थित होते.

Comments are closed.