इराणसोबतच्या युद्धाला अमेरिकन जनतेचा विरोध; ७७ टक्के लोकांना दहशतवादी हल्ल्याची भीती, सर्वेक्षणातून माहिती समोर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन जनतेचे मत जाणून घेण्यासाठी घेण्यात आलेल्या एका ताज्या सर्वेक्षणातून अत्यंत धक्कादायक आणि महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. या सर्वेक्षणानुसार, बहुतांश अमेरिकन नागरिकांनी इराणसोबतच्या युद्धाला विरोध दर्शवला आहे. क्विनीपियाक युनिव्हर्सिटीने (Quinnipiac University) केलेल्या सर्वेक्षणानुसार, अमेरिकन मतदारांना या लष्करी संघर्षाचे पडसाद म्हणून स्वतःच्या देशात दहशतवादी हल्ले होण्याची मोठी भीती वाटत आहे.

या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या लोकांपैकी ७७ टक्के जणांनी इराणविरुद्धच्या लष्करी कारवाईचा बदला म्हणून अमेरिकन भूमीवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवली आहे. यामध्ये ३३ टक्के लोकांना ही शक्यता खूप जास्त वाटते, तर ४४ टक्के लोकांनी ती काही प्रमाणात असल्याचे म्हटले आहे. याउलट केवळ १९ टक्के नागरिकांना अशा प्रकारच्या कोणत्याही हल्ल्याची भीती वाटत नसल्याचे म्हटले आहे.

लष्करी कारवाईच्या मुद्द्यावर ५३ टक्के मतदारांनी इराणविरोधातील युद्धाला स्पष्ट विरोध दर्शवला असून ४० टक्के लोकांनी या कारवाईचे समर्थन केले आहे. इराण हा अमेरिकेसाठी मोठा धोका आहे का, या प्रश्नावर ५५ टक्के नागरिकांनी ‘नाही’ असे उत्तर दिले आहे. तर ३९ टक्के नागरिकांना इराणकडून धोका वाटतो.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यपद्धतीवरही या सर्वेक्षणातून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. ६२ टक्के मतदारांच्या मते, ट्रम्प प्रशासनाने इराणविरुद्ध लष्करी कारवाई करण्यामागची ठोस कारणे स्पष्ट केलेली नाहीत. तसेच ५९ टक्के नागरिकांचे असे मत आहे की, कोणतीही लष्करी पावले उचलण्यापूर्वी ट्रम्प यांनी काँग्रेसची (संसद) रीतसर परवानगी घेणे आवश्यक होती. इराणची परिस्थिती हाताळण्याच्या ट्रम्प यांच्या पद्धतीला केवळ ३७ टक्के लोकांनी पसंती दर्शवली असून ५७ टक्के लोकांनी याला नापसंती दर्शवली आहे.

Comments are closed.