खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेर 24 तास रुग्णवाहिका उपलब्ध करा; शिव आरोग्य सेनेची मागणी

खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णावाहिका उपलब्ध नसल्यामुळे एका गर्भवती महिलेला दोन तास ताटकळत राहावे लागले होते. या घटनेची गंभीर दखल घेऊन शिव आरोग्य सेनेने खालापूर तालुका आरोग्य कार्यालयावर धडक देत सर्व आरोग्य केंद्रांवर २४ तास रुग्णवाहिका उपलब्ध करा, अशी मागणी आरोग्य अधिकाऱ्यांकडे केली.

उंबरे येथे राहणाऱ्या गर्भवती महिलेची तब्येत बिघडल्याने त्यांना खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र तिचे हिमोग्लोबिन अचानक कमी झाल्याने डॉक्टरांनी अधिक उपचारासाठी तिला अलिबाग जिल्हा रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला. मात्र केंद्राची रुग्णवाहिका बिघाडलेली असल्यामुळे डॉवटरांना १०८ रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. ही रुग्णवाहिका दोन तास उशिरा आल्यामुळे गर्भवती महिलेची फरफट झाली.

या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन शिव आरोग्य सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष डॉ. परेश देशमुख यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाच्या कार्यालयावर धडक दिली. आरोग्य अधिकारी डॉ. कल्याणी इंगोले यांना निवेदन देऊन या समस्येकडे लक्ष वेधले. यावेळी शहर समन्वयक सचिन पाटील, शहर संघटक सुनील पवार, अर्चना क्षीरसागर, शहर संघटक अस्मिता नाईक, खोपोली विभाग संघटक विलास पाटील, रोशन शिंदे, हेमंत काणेकर आदी उपस्थित होते.

Comments are closed.