'देवभूमी' उत्तराखंडला जगाची आध्यात्मिक राजधानी बनवा!

पंतप्रधान मोदी यांचे आवाहन : विकासकामांची पायाभरणी

► वृत्तसंस्था/ देहराडून

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी देहरादून येथे आयोजित ‘उत्तराखंड रौप्यमहोत्सवी सोहळ्या’ला उपस्थिती दर्शवली. याप्रसंगी आपल्या भाषणात पंतप्रधानांनी राज्याच्या स्थापनेच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यात सहभागी होणे आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगत ‘देवभूमी’ उत्तराखंडला जगाची आध्यात्मिक राजधानी बनवा, असे आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडच्या स्थापना दिनी 8,200 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी केली. तसेच याप्रसंगी त्यांनी एक स्मारक टपाल तिकिटही जारी केले.

उत्तराखंड राज्याच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी जनतेचे विशेष आभार मानले. उत्तराखंड आज ज्या उंचीवर पोहोचला आहे ते पाहून या सुंदर राज्याच्या उभारणीसाठी संघर्ष करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आनंद होणे स्वाभाविक असल्याचे ते म्हणाले. आज उत्तराखंड राज्य 25 वर्षे पूर्ण करत असताना समृद्धीचा काळ आल्याचे पाहून मन प्रफुल्लित होत आहे. आता नजिकच्या काळात येथे भाविक आणि पर्यटकांचा ओढा वाढणार असल्याचा दृढ विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

देवभूमी उत्तराखंडचे भारताच्या आध्यात्मिक जीवनाचे हृदयस्थान असे वर्णन करताना गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ, जागेश्वर आणि आदि कैलास ही तीर्थक्षेत्रे आपल्या श्रद्धेचे प्रतीक आहेत. दरवर्षी लाखो भाविक या पवित्र तीर्थस्थळांना भेट देतात. त्यांचा प्रवास भक्तीचा मार्ग मोकळा करतो आणि उत्तराखंडच्या अर्थव्यवस्थेला नवीन ऊर्जा देतो, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. उत्तराखंडची खरी ओळख त्याच्या आध्यात्मिक शक्तीमध्ये आहे. जर उत्तराखंडने संकल्प केला तर ते पुढील काही वर्षांत जगाची आध्यात्मिक राजधानी म्हणून स्वत:ला स्थापित करू शकते. आपण येथील मंदिरे, आश्रम आणि योग केंद्रे जागतिक केंद्रांशी जोडू शकतो, असा आशावादही पंतप्रधानांनी व्यक्त केला.

25 वर्षांपूर्वी उत्तराखंडची नव्याने स्थापना होताना येथे अनेक आव्हाने होती. संसाधने मर्यादित होती, बजेट लहान होते, उत्पन्नाचे स्रोत कमी होते आणि बहुतेक गरजा केंद्रीय मदतीने पूर्ण केल्या जात होत्या. आज, चित्र पूर्णपणे बदलले आहे. 25 वर्षांपूर्वी उत्तराखंडचे बजेट 4,000 कोटी रुपये होते. हाच आकडा आता 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला आहे. गेल्या 25 वर्षांत उत्तराखंडमध्ये वीजनिर्मिती चौपट झाली आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या 10 पटीने वाढली आहे. पूर्वी फक्त एक वैद्यकीय महाविद्यालय होते, परंतु आता 10 आहेत. येथील रस्ते सुधारले आहेत. हवाई वाहतूकही विस्तारत असल्यामुळे पर्यटक-भाविकांचा ओघ वाढत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.

कोट्यावधींच्या प्रकल्पांचे उद्घाटन

पंतप्रधान मोदी यांनी 8,140 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. 930 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन झाले, तर 7,210 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांचे पायाभरणी करण्यात आली. या प्रकल्पांमध्ये पिण्याचे पाणी, सिंचन, तांत्रिक शिक्षण, ऊर्जा, शहरी विकास, क्रीडा आणि कौशल्य विकास यासारख्या प्रमुख क्षेत्रांचा समावेश आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी पीक विमा योजनेअंतर्गत 28,000 हून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट 62 कोटी रुपयांची मदत प्रदान केली.

Comments are closed.