संधीचे सोने करा, ब्राझील-उरुग्वे लढतीआधी फुटबॉलपटूंना छेत्रीचा कानमंत्र
हिंदुस्थानी फुटबॉलचा सर्वाधिक लोकप्रिय चेहरा आणि माजी कर्णधार सुनील छेत्री मैदानाबाहेर असला तरी हिंदुस्थानी फुटबॉलची घसरण त्याला अस्वस्थ करतेय. आगामी ब्राझील आणि उरुग्वेविरुद्धच्या सामन्यांवर बोलताना छेत्रीने एकीकडे आपल्या कारकीर्दीत अशी संधी न मिळाल्याची खंत व्यक्त केली, तर दुसरीकडे हिंदुस्थानी फुटबॉलमधील दोषारोपांच्या राजकारणावरही थेट निशाणा साधला.
हिंदुस्थानला 3 ऑक्टोबरला ब्राझील आणि 6 ऑक्टोबरला उरुग्वेविरुद्ध कोलकात्यात खेळण्याची संधी मिळणार आहे. ही लढत पाहताना आपल्याला थोडा हेवा वाटतो, अशी कबुली छेत्रीने दिली. जवळपास 20 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत आपल्याला ब्राझील किंवा उरुग्वेविरुद्ध खेळता आले नाही, याची त्याला हुरहूर आहे. मात्र, आता ही त्यांची वेळ आहे, असे सांगत त्याने युवा हिंदुस्थानी खेळाडूंनी या संधीचे सोने करावे, असे आवाहन केले. छेत्रीच्या पुनरागमनाच्या चर्चेलाही त्याने मजेशीरपणे पूर्णविराम दिला. जवळपास 42 वर्षांचा झालो असून 20 मिनिटे प्रशिक्षण घेतल्यानंतरच दमछाक होते, त्यामुळे पुनरागमनाचा प्रश्नच नाही, असे त्याने स्पष्ट केले. मात्र हिंदुस्थानी फुटबॉलच्या सद्यस्थितीवर बोलताना छेत्रीचा सूर गंभीर झाला. हिंदुस्थानची फिफा क्रमवारी घसरत असताना खेळाडू, प्रशिक्षक, एआयएफएफ किंवा माध्यमांपैकी कोणालाही एकटय़ाला दोष देता येणार नाही, असे त्याने स्पष्ट केले. जिंकायला हवे असलेले सामने गमावल्याची जबाबदारी खेळाडूंनीही स्वीकारली पाहिजे, असे तो म्हणाला.
‘हा खेळाडू वाईट, तो प्रशिक्षक वाईट, एआयएफएफ वाईट’ असा दोषारोपांचा खेळ थांबवा, असा छेत्रीने स्पष्ट देत एकमेकांवर चिखलफेक करण्याऐवजी उपाय शोधण्याची वेळ आल्याचे सांगितले.
Comments are closed.