सामनाचा दणका, माळशेजमधील भूमिपुत्रांच्या आंदोलनाचा झटका; अदानीच्या पॉवर प्रोजेक्टची जनसुनावणी स्थगित

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

निसर्गरम्य माळशेज घाट परिसरात अदानी रिन्युएबल एनर्जीने १५०० मेगावॅट क्षमतेचा वीजप्रकल्प उभारणार असल्याची प्रदूषण नियंत्रण मंडळाची अधिसूचना जाहीर होताच भूमिपुत्रांच्या संतापाचा स्फोट झाला. दैनिक ‘सामना’ने बातमीतून दिलेला दणका, ‘अदानी हटाव सह्याद्री बचाव’ समितीने केलेला मॅरेथॉन रस्ता रोको, भूमिपुत्रांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण यामुळे अखेर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने माघार घेतली आहे.

अदानीच्या या प्रकल्पासाठी शुक्रवारी २१ ऑगस्ट रोजी होणारी जनसुनावणीच प्रदूषण नियंत्रण मंडळाने स्थगित केली असून तसे प्रसिद्धीपत्रकच त्यांनी जारी केले आहे. निसर्गरम्य माळशेज घाटात बाराही महिने उपलब्ध असलेल्या पाण्याचा वापर करीत अदानी रिन्युएबल एजन्सी ५२ लिमिटेड यांनी १५०० मेगावॅट क्षमतेचा वीजप्रकल्प (एनर्जी प्रोजेक्ट) उभारण्याची तयारी केली. त्यासाठी पुणे जिल्ह्यातील आडोशी येथे ७.९५ दशलक्ष घनमीटरचे धरण तर ठाणे जिल्ह्यातील मुरबाडच्या भोरांडे येथे ८.९७ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे धरण उभारण्याची योजना आहे. बोगद्यातून खाली पाणी फेकून टर्बाईनमार्फत ही वीजनिर्मिती करण्याचा प्लॅन अदानीने बनवला आहे. त्यानंतर या प्रकल्पासाठी मंत्रालयातून प्रशासकीय यंत्रणा जोरात कामाला लागली. मुरबाड तालुक्यातील ५५ गावे आणि साडेचारशे हेक्टर जमीन या प्रकल्पात जाणार आहे. त्यामुळे येथील शेकडो आदिवासी कुटुंबे उद्ध्वस्त होणार आहेत. जुन्नर तालुक्यातील २४ गावे या प्रकल्पात बाधित होणार असून दोन्ही तालुक्यांतील तब्बल ७९ गावे नकाशातूनच गायब होणार आहेत. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ उपप्रादेशिक कार्यालय पुणे यांच्यामार्फत लगोलग २१ ऑगस्ट रोजी जुन्नर तालुक्यातील अजनावळे येथे जनसुनावणी घेण्याची अधिसूचनाही काढण्यात आली. याबाबतचे पहिले सविस्तर वृत्त दैनिक ‘सामना’मधून ६ ऑगस्टच्या अंकात प्रसिद्ध होताच या बातमीची कात्रणे झेरॉक्स काढून वाटण्यात आली. सरकारने ग्रामस्थांना अंधारात ठेवून या प्रकल्पाला दिलेल्या मंजुरीला कडाडून विरोध करण्यासाठी स्वातंत्र्यदिनी ‘अदानी हटाव सह्याद्री बचाव’ समितीचे अध्यक्ष देवराम लांडे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण-नगर मार्गावरील मढ-पारगाव-माळशेज हायवेवर शेकडो ग्रामस्थांनी भरपावसात रास्ता रोको केला. त्याचवेळी जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सूरज वाजगे यांनीही बेमुदत उपोषण सुरू केले.

दहा दिवसांच्या उपोषण आंदोलनाला यश

सामाजिक कार्यकर्ते सूरज वाजगे यांनी शिवछत्रपतींचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी जोपर्यंत अदानीची जनसुनावणी रद्द होत नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण करण्याचा निर्धार केला. तब्बल १० दिवस हे उपोषण सुरू होते. समाजाच्या विविध स्तरांतून विशेषतः जेन झीचा मोठा पाठिंबा या उपोषणाला मिळाला. सरकार जितकी गळचेपी करेल तितके हे आंदोलन तीव्र होत जाईल, असा इशारा वाजगे यांनी देताच प्रशासन हादरले. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला अदानीची सुनावणी स्थगित करण्याचे आदेश दिले. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने २१ ऑगस्ट रोजी होणारी अदानी पॉवर प्रोजेक्टची जनसुनावणीच स्थगित करत असल्याचे लेखी पत्र जारी केले. वाजगे यांच्या या आंदोलनाला मिळालेल्या यशाने मुरबाड, जुन्नरमधील आदिवासी भूमिपुत्र आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जे औरंग्याच्या मोगलाईला जमले नाही ते या अडाणीला शिवरायांच्या भूमीत आणण्याचे पाप कोणी केले आहे? हा प्रकल्प येणार असल्याची माहिती असणाऱ्यांनी आधीच या भागात जमिनी खरेदी केल्या आहेत. तेही या पापात सहभागी आहेत. आदिवासींसोबत बेईमानी कोणी केली याचा हिशेब द्यावाच लागेल. – सूरज वाजगे, उपोषणकर्ते

Comments are closed.