ममता बॅनर्जी-ईडी समोरासमोर

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी : बंगालमध्ये धमकाविण्यात आल्याचा ईडीचा आरोप : आय-पॅकवरील छापा प्रकरण

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पश्चिम बंगालमध्ये आय-पॅकशी निगडित छाप्याप्रकरणी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली आहे. यादरम्यान ममता बॅनर्जी सरकारने विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये केंद्र सरकार ईडीचा अस्त्र म्हणून वापर करत असल्याचा आरोप केला. तर केंद्रीय यंत्रणेने पश्चिम बंगालमध्ये ममता सरकारकडून धमकाविण्यात आल्याचा प्रतिदावा सुनावणीदरम्यान केला आहे. दोन्ही पक्षांदरम्यानच्या युक्तिवाद-प्रतिवादावर सर्वोच्च न्यायालयाने कुणाचा अस्त्र म्हणून वापर केला जातोय आणि कुणाला धमकाविले जातेय हे आम्ही निश्चित करू अशी टिप्पणी केली आहे.

ईडीने आय-पॅक छापाप्रकरणाचा तपास सीबीआयकडून करविण्याच्या मागणीवरून सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. 8 जानेवारी रोजी आय-पॅकच्या कार्यालयांवरील छाप्यादरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि बंगाल पोलीस अधिकाऱ्यांनी आमच्या कारवाईत अडथळे निर्माण केल्याचा आरोप ईडीने केला आहे. याप्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने 18 मार्चपर्यंत टाळली आहे. यापूर्वी 3 फेब्रुवारी रोजी सुनावणी टाळण्यात आली होती. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांचे ईडीच्या चौकशीत अडथळे निर्माण करणे अत्यंत गंभीर मुद्दा असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने 15 जानेवारी रोजी म्हटले होते.

2,742 कोटीचे मनी लॉन्ड्रिंग

आय-पॅक म्हणजेच इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमिटी एक राजकीय सल्लागार कंपनी आहे. ही कंपनी राजकीय पक्षांसाठी मोठ्या स्तरावर निवडणूक अभियानांचे नियोजन अन् आखणी करते. कंपनी आणि तिचे संचालक प्रतीक जैन यांच्यावर कोट्यावधी रुपयांच्या कोळसा चोरी प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगचा आरोप आहे. सीबीआयने याप्रकरणी 27 नोव्हेंबर 2020 रोजी एफआयआर नोंदविला होता.  पूर्ण प्रकरण 2,742 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंगशी निगडित आहे. 20 कोटी रुपये हवालाच्या माध्यमातून आय-पॅकपर्यंत हस्तांतरित झाल्याचा आरोप आहे. ईडीने याप्रकरणी 28 नोव्हेंबर 2020 रोजी चौकशी सुरू केली होती. तर 8 जानेवारी 2026 रोजी ईडीने कोलकात्यात आय-पॅक आणि तिचे संचालक प्रतीक जैन यांच्या निवासस्थानी छापे टाकले होते.

छाप्यादरम्यान ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप

छाप्याच्या कारवाईदरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या अन्य तृणमूल नेत्यांसोबत आय-पॅकच्या कार्यालयात पोहोचल्या होत्या. त्यावेळी मोठा गोंधळ झाला होता. ममता बॅनर्जी आय-पॅकच्या कार्यालयातून अनेक फाईल्स घेऊन बाहेर पडत प्रसारमाध्यमांना संबोधित केले होते. आय-पॅक ही कंपनी तृणमूल काँग्रेससाठी निवडणूक व्यूहनीतिकार म्हणून काम करत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी ईडीने  निवडणूक व्यूहनीतिशी निगडित माहिती प्राप्त करण्यासाठी छापा टाकल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला होता. तसेच बंगाल पोलिसांनी ईडी अधिकाऱ्यांच्या विरोधात एफआयआर नोंद केला होता.

Comments are closed.