सर्पदंश झालेल्या व्यक्तीला तत्काळ उपचार न मिळाल्याने मृत्यू, वैद्यकीय अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा आरोप

रत्नागिरी तालुक्यातील गोळप-तोरस्करवाडी येथील प्रौढाचा सर्पदंशाने मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी 2.30 वा.सुमारास घडली. तात्काळ उपचार न केल्याने प्रौढाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या मृत्यूची चौकशी करण्यासाठी जिल्हा रूग्णालय प्रशासनाने समिती स्थापन केली आहे.

नरेश शंकर आंबेकर (53,रा.गोळप-तोरस्करवाडी,रत्नागिरी) असे सर्पदंशाने मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. गुरुवारी दुपारी ते घराजवळ काम करत असताना त्यांना अचानकपणे सर्पदंश झाला. ही बाब त्यांच्या नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी त्यांना तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. परंतू आंबेकर यांच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, जिल्हा शासकिय रुग्णालयात तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी सर्पदंश झालेल्या नरेश आंबेकर यांच्यावर तात्काळ उपचार न केल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप केला. दरम्यान, या सर्व प्रकारानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका अध्यक्ष शेखर घोसाळे,विभागप्रमुख प्रकाश साळवी व इतर पदाधिकार्‍यांनी जिल्हा शासकिय रुग्णालयात धडक दिली होती.

चौकशीसाठी समिती स्थापन

नरेंद्र शंकर आंबेकर (वय 53, रा. गोळप, ता. रत्नागिरी) यांच्या उपचारादरम्यान झालेल्या मृत्यू प्रकरणी त्यांच्या नातेवाईकांनी आपत्कालीन विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. या आरोपांची दखल घेत सखोल चौकशी करण्यासाठी वैद्यकीय अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांनी वैद्यकीय अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली आहे. ​ उपचारादरम्यान रुग्ण आंबेकर यांचा मृत्यू झाला. त्यांच्या नातेवाईकांनी आपत्कालीन विभागातील त्यावेळी कार्यरत असणाऱ्या वैद्यकीय अधिकारी यांच्यावर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे. यानंतर अधिष्ठाता डॉ.रामानंद यांनी तातडीने पावले उचलत चौकशी समिती गठीत केली. ही समिती या प्रकरणाची सखोल चौकशी करणार असून, चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालातील निष्कर्षांवर आधारित पुढील योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

Comments are closed.