Thane crime news – अंदाधुंद गोळीबाराने मुंब्रा हादरले; फिल्मी स्टाईल पाठलाग करून पोलिसांनी आरोपीला पकडले
मुंब्रा कौसा येथील अरमान सोसायटी परिसरात शनिवारी पहाटे अंदाधुंद गोळीबार झाला. या घटनेने मुंब्रा शहर अक्षरशः हादरले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी फिल्मी स्टाईल पाठलाग करून आरोपीला अटक केली आहे. शहाबाद उर्फ शब्बू कुरेशी (वय – 28) असे आरोपीचे नाव असून तो मुंब्रा येथील रहिवासी आहे.
आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर दिल्लीतील जाफराबाद परिसरातील चार पोलीस ठाण्यांमध्ये विविध गुन्हे दाखल असल्याचे तपासात उघड झाले आहे. तसेच तो यापूर्वी तिहार कारागृहात 8 वर्षे शिक्षा भोगून आला आहे. दरम्यान, या गोळीबारात दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मुंब्राच्या कौसा परिसरातील अल्मास कॉलनी येथील अरमान सोसायटी राहणारे नदीम खान उर्फ बाबा खान (वय – 45) यांच्या घराबाहेर एक तरुणाने गोळीबार केला. पहाटे पावणे पाचच्या सुमारास त्याने एका कारवर दोन गोळ्या झाडल्या व एक गोळी हवेत फायर केली. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच बिट क्रमांक 3 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजस सावंत, सोनवणे व तपास पथकाने घटनास्थळी पोहचले. त्यावेळी हल्लेखोर आचार गल्ली येथील भंगार गोदामाजवळ लपून बसल्याचे त्यांना समजले.
पथक तेथे पोहोचताच हल्लेखोराने दोन पिस्टल बाहेर काढल्या आणि पोलिसांच्या दिशेने गोळीबार करत पळ काढला. फिल्मी स्टाईलने हवेत गोळीबार करत तो पळत होता आणि पोलीस त्याचा पाठलाग करत होते. पोलीस मागावर असल्याचे पाहून त्याने पुन्हा पोलिसांच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. या अंधाधुंद गोळीबारामध्ये दोन जण जखमी झाले. त्या दोघांवर मुंब्र्यातील काळसेकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कथा | ठाण्यात सोशल मीडियावर प्रभाव टाकणाऱ्या गृहनिर्माण संस्थेवर गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला अटक; पाठलाग करताना २ जखमी
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात शनिवारी पहाटे एका व्यापारी आणि सोशल मीडियावर प्रभाव टाकणाऱ्याच्या हाउसिंग सोसायटीवर हल्लेखोरांनी गोळीबार केला, नंतर पोलिसांसह… pic.twitter.com/neTNvWy8GP
— प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (@PTI_News) 7 मार्च 2026
अखेर पोलिसांना हल्लेखोर शहाबादला पकडण्यात यश मिळाले. त्याच्याकडून पोलिसांनी दोन पिस्तूल, चार जिवंत काडतुसे आणि चार मॅगझिन जप्त केल्या आहेत. या हल्ल्यात त्याच्या आणखी एका साथीदाराचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात समोर आले असून त्याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. एवढा मोठा शस्त्रसाठा त्याने कशासाठी आणला होता व कोणत्या कारणासाठी आणला होता याचा तपास करत आहेत. या हल्ल्यानंतर नदीम खान यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिसरातील परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Comments are closed.