मानव सुथारची लागली लॉटरी! अफगाणिस्तानविरुद्धच्या भन्नाट कामगिरीचा फायदा, काउंटी संघासोबत केला करार

भारताने नुकतेच अफगाणिस्तान विरुद्ध कसोटी सामना जिंकला. यामध्ये पदार्पण केलेल्या स्पेशल फिरकीपटूने उल्लेखनीय कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले. मानव सुथारने अफगाणिस्तानच्या पहिल्याच डावात ६ विकेट्स घेत अनेक विक्रमांना गवसणी घातली. आता त्याला काउंटी संघाने करारबद्ध केले आहे.

भारताचा नवखा फिरकी गोलंदाज मानव सुथारने काउंटी चॅम्पियनशीपच्या पुढील दोन फेऱ्यांसाठी वॉरविकशायरसोबत करार केला आहे. ही माहिती इंग्लिश क्लबने बुधवारी (१० जून) दिली. तो १२ जूनपासून वॉरविकशायरच्या यॉर्कशायरविरुद्ध आणि त्यानंतर सॉमरसेट विरुद्धच्या सामन्यांसाठी उपलब्ध होणार आहे.

भारतीय संघात पदार्पण करण्याआधी मानवने २९ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये १२९ विकेट्स घेतल्या होत्या. वॉरविकशायरने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले की, काउंटी चॅम्पियनशीपच्या विजेतेपदासाठीच्या त्यांच्या प्रयत्नांमध्ये मानव त्यांच्या गोलंदाजीला एक नवे वळण देईल.

करारानंतर एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे बोलताना मानव म्हणाला की, हंगामाची दमदार सुरूवात केलेल्या संघात सामील झाल्याचा त्याला आनंद आहे. तसेच त्यांच्या विजेतेपदाच्या शर्यतीत योगदान देण्याची त्याला आशा आहे.

वॉरविकशायर संघ सध्या डिव्हिजन वनच्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहेत. त्यांनी सहा सामन्यांमध्ये दोन विजय आणि दोन बरोबरी साधली आहे.

Comments are closed.