मनदीप भंडारी यांची सीबीएसईच्या अध्यक्षपदी नियुक्ती.
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकारने ज्येष्ठ सनदी अधिकारी मनदीप भंडारी यांची केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) नव्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. भंडारी हे पंजाबचे रहिवासी असून सध्या ते जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांचे प्रधान सचिव म्हणून कार्यरत आहेत. नुकत्याच करण्यात आलेल्या प्रशासकीय फेरबदलात त्यांच्यावर आता नवी जबाबदारी देण्यात आली आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने भंडारी यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. भंडारी सध्या अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्या लोखंडे प्रशांत सीताराम यांच्याकडून सीबीएसई अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारतील. भंडारी हे एजीएमयूटी (अरुणाचल प्रदेश, गोवा, मिझोराम आणि केंद्रशासित प्रदेश) केडरचे 2001 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) नागरी सेवा परीक्षेद्वारे थेट भरतीतून नागरी सेवेत प्रवेश केला.
मनदीप भंडारी यांनी शासकीय सेवेत 25 वर्षांहून अधिक काळ पूर्ण केला असून 10 वेगवेगळ्या ठिकाणी सुमारे 10 पदांवर काम केले आहे. वरिष्ठ आयएएस अधिकारी मनदीप भंडारी यांची पार्श्वभूमी वैद्यकीय आहे. त्यांच्या शैक्षणिक पात्रतेमध्ये पंजाब विद्यापीठ, चंदीगड आणि दयानंद मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमधून एमबीबीएस पदवीचा समावेश आहे. त्यांच्या सेवा प्रोफाइलमध्ये शस्त्रक्रिया आणि वैद्यकशास्त्रातील पात्रतेचा उल्लेख आहे.
Comments are closed.