Mangesh Chivate: आजचा दिवस प्रेरणादायी अन् दिशादर्शक ठरला- मंगेश चिवटे


-मंगेश चिवटे

महाराष्ट्र राज्याचे जेष्ठ नेते मा.खा.श्री.शरदचंद्र पवार साहेब यांची दीपावली – पाडवा निमित्त सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले. सकाळी बरोबर ७.३० वाजता सिल्वर ओक निवासस्थानी भेट घेतली. आजच्या आदरणीय श्री.पवार साहेब यांना ३ पुस्तके भेट दिली आणि प्रत्येक पुस्तकावर आदरणीय श्री.पवार साहेब यांनी ५ मिनिटे चर्चा केली. विशेष म्हणजे भेट दिलेल्या तीन पुस्तकांपैकी दोन पुस्तके पवार साहेब यांनी अगोदरच वाचलेली होती. ऑटोमिक हॅबिट्स आणि शाहूंच्या आठवणी या पुस्तकांमध्ये नेमके काय आहे याचा संदर्भ देखील श्री.पवार साहेब यांनी चर्चेदरम्यान दिला.

ऑटोमिक हॅबिट्स हे पुस्तक मी वाचले असून पुस्तकामध्ये दररोज चांगल्या सवयी अंगीकारल्याने आयुष्यात यशाच्या सर्वोच्च शिखरापर्यंत जाता येते या संबंधाने सदर पुस्तकाचा विषय असल्याचे श्री.पवार साहेब यांनी सांगितले त्यावेळी अक्षरशः थक्क व्हायला झाले. सतत माणसांच्या गराड्यात, सतत दौऱ्यामध्ये व्यस्त असताना देखील वयाच्या 86 व्या वर्षी देखील पुस्तके वाचण्यासाठी एवढा मोठा माणूस वेळ काढत असेल तर आपण का नाही ? हा माझाच मला पडलेला प्रश्न अंतर्मुख करून गेला. महिन्यातुन एक तरी पुस्तक वाचून पूर्ण करण्याचा संकल्प आज केला.

शाहूंच्या आठवणी हे छत्रपती शाहू महाराज यांच्यावर श्री साळुंखे सर लिखित भेट दिलेले पुस्तक देखील श्री.पवार साहेब यांनी यापूर्वीच वाचले असल्याचे सांगितले. छत्रपती शाहू महाराज यांच्या विषयी आदरणीय पवार साहेब भरभरून बोलले. “चिवटे, तुम्ही आरोग्य विषयात काम करत आहात त्यामुळे तुम्हाला सांगतो एकदा छत्रपती शाहू महाराज यांच्या आरोग्य विषयातील कार्याचा आवर्जून देखील अभ्यास करा.”आपण सर्वांनी क्वारंटाईन हा शब्द कोविड संकट काळात कदाचित पहिल्यांदाच ऐकला असेल; परंतु 1907-8 च्या दरम्यान प्लेगची साथ ज्यावेळी आली होती तेव्हा छत्रपती शाहू महाराजांनी भारतातील पहिले क्वारंटाईन सेंटर कोल्हापूरच्या शेजारी असलेल्या जयसिंगपूर भागात सुरू केले होते. त्यावेळी कोल्हापूर करवीर नगरीमध्ये प्रवेश करण्यापूर्वी जयसिंगपूर भागातील क्वारंटाईन सेंटरमध्ये नागरिकांना ठेवले जाई, आणि त्यांचे प्राथमिक तपासणी केली जात असे. प्लेगची लक्षणे नसलेल्या नागरिकांनाच कोल्हापूरमध्ये प्रवेश दिला जात असे आणि प्लेगची लक्षणे असलेल्या रुग्णांना तज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली योग्य उपचार आणि औषधे दिली जात असे. यासंबंधी कोल्हापूर येथील लेखक व संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार सर आणि त्यांची पत्नी व मुलगी यांनी विस्तृत लिखान केलेले आहे. कोल्हापुरात गेला तर त्यांची भेट घ्या आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या आरोग्य विषयक कामाची अधिक माहिती घ्या आणि अभ्यास करा. यानिमित्ताने तुम्हाला छत्रपती शाहू महाराज यांचे आरोग्य विषयक कामातील दूरदृष्टीकोन समजेल असे श्री.पवार साहेब म्हणाले. यावर, मी लवकरच कोल्हापूरमध्ये आवर्जून जाऊन डॉक्टर जयसिंगराव पवार सर यांची भेट घेऊन छत्रपती शाहू महाराज यांचे आरोग्य विषयक कामकाज समजून घेईल असे सांगितले.

याच अनुषंगाने नुकताच तामिळनाडू, तंजावर येथील झालेल्या मराठी भाषिक बांधवांच्या कार्यक्रमाचा उल्लेख निघाला. मी स्वतः तंजावर येथे गेलो असल्याचे सांगितले. यावेळी श्री. पवार साहेब यांनी तंजावर येथील सर्वात मोठे आणि ऐतिहासिक असलेले सरस्वती ग्रंथ संग्रहालय पाहिले का ? छत्रपती शिवाजी महाराज यांचा समकालीन संदर्भ असलेला शिवभारतम ग्रंथ पाहिला का ? तेथील छत्रपती बाबाजीराजे भोसले यांना भेटला का ? असे प्रश्न विचारले. छत्रपती शिवाजी महाराज यांचे सावत्र बंधू छत्रपती व्यंकोजी राजे यांची ही गादी असून याविषयीचा सर्व इतिहासच पवार साहेब यांनी गप्पांमध्ये सांगितला. हा “अहद तंजावर – तहद पेशावर अवघा मुलुख आपला ” हे छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले भव्य स्वप्न आणि मराठ्यांचा साम्राज्यविस्तार यावर देखील श्री.पवार साहेब बोलले.  महाराष्ट्र असो की तमिळनाडू आणि तेथील मराठी भाषिक बांधव या सर्वांशी घट्ट जोडलेली नाळ यानिमित्ताने पवार साहेब यांच्या बोलण्यातून दिस दिसत होती. मी राज्याचा मुख्यमंत्री असताना प्रत्येक वेळी तामिळनाडू तंजावर येथील मराठी भाषिक बांधवांच्या संमेलनाला जात असे. सोबत  तमिळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि तेथील सर्व प्रशासनाला देखील सोबत घेत असे. अशा कार्यक्रमांना गेल्यामुळे तेथील मराठी भाषिक बांधवांच्या पाठीशी महाराष्ट्र सरकार आहे हा संदेश जात असे असा संदर्भ श्री.पवार साहेब यांनी दिला. हाच धागा पुढे पकडत महाराष्ट्र शासनाच्या वतीने यावर्षी राज्याचे उद्योग तथा मराठी भाषिक मंत्री श्री.उदय सामंत साहेब हे तमिळनाडू, तंजावर या ठिकाणी मराठी भाषिक मेळाव्यासाठी आले होते आणि त्यांच्या समवेत मी गेलो होतो अशी आठवण  श्री. पवार साहेब यांना सांगितली. तंजावर येथे झालेल्या कार्यक्रमात आयोजकांनी देखील त्यांच्या भाषणात श्री शरद पवार साहेब यांच्यानंतर तामिळनाडू येथील मराठी माणसाला राजाश्रय देण्यासाठी प्रथमच शिवसेनेचे मंत्री श्री उदय सामंत साहेब आले आहेत उल्लेख केल्याची आठवण त्यांना सांगितली. राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली श्री उदय सामंत साहेब यांनी तंजावर येथे मराठी भाषिक भवन उभी करण्याची घोषणा केली असल्याचे श्री पवार साहेब या सांगितले. श्री उदय सामंत आणि महाराष्ट्र शासनाच्या या भविष्यातील उपक्रमाबद्दल श्री.पवार साहेब यांनी समाधान व्यक्त केले.

संपादक आणि जेष्ठ पत्रकार श्री मधुकर भावे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मा.खा.डॉ.श्रीकांत दादा शिंदे यांनी “ऑपरेशन सिंदूर” साठी केलेले ४ देशांचे दौरे आणि भारताची मांडलेली भूमिका यावर एक पुस्तक संपादित करत असल्याचे श्री. पवार साहेब यांस सांगितले. यावेळी माझ्या मातृभूमी करमाळा येथील प्रतिथयश डॉक्टर सौ.प्राची अक्षय पुंडे मॅडम यांनी Wellnes Redefine या विषयावर लिहलेले इंग्रजी पुस्तक भेट दिले. हे पुस्तक नवे आणि विषय नवा असल्याने श्री पवार साहेब यांनी हे पुस्तक पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंत संपूर्ण पुस्तक चाळले. चांगले मन , बुद्धिमत्ता, अध्यात्मिकता, आधुनिकीकता आणि सौंदर्यता यांचा एकत्रित ( Glamowell ) एकमेकांशी कसा आंतरसंबंध आहे हा पुस्तकाचा विषय असल्याचे मी सांगितले. डॉ.पुंडे मॅडम आमच्या करमाळयाच्या असून त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये माझा जन्म झाला आहे. आपण आवर्जून पुस्तक वाचून अभिप्राय द्यावा अशी नम्र विनंती यावेळी श्री. पवार साहेब यांस केली. करमाळयासारख्या ग्रामीण भागातील एक महिला डॉक्टर इंग्रजी मध्ये पुस्तक लिहते आहे याचे विशेष कौतुक श्री पवार साहेब यांनी केले. पुस्तक नक्की वाचून लेखकांना अभिप्राय देखील कळवेळ असे सांगितले.

शेवटी निघताना, पुढील वर्षी होणाऱ्या पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघातुन मी तयारी करत असल्याचे सांगितले. यावेळी श्री.पवार साहेब यांनी या विषयावर प्रथम “थोडक्यात” आणि नंतर “सविस्तर” माहिती जाणून घेतली. शिक्षक असो की पदवीधर या दोन्ही निवडणुकांमध्ये मतदार नोंदणी हा महत्वाचा भाग आहे त्यावर लक्ष द्या असा सल्ला श्री.पवार साहेब यांनी यावेळी दिला. एकूणच आजचा दिवस प्रेरणादायी आणि दिशादर्शक ठरला. आजच्या श्री.पवार साहेब यांच्या अविस्मरणीय भेटीत दररोज राजकीय, सामाजिक किंवा इतर कोणत्याही चांगल्या विषयांवरील पुस्तकांची किमान ४ पाने वाचल्याशिवाय दिवसाची सुरुवात किंवा शेवट करायचा नाही हा संकल्प केला. श्री. पवार साहेब शतायुषी होवोत, त्यांना उत्तम निरोगी आयुष्य मिळोत हीच प्रार्थना. या अविस्मरणीय भेटीचा योग जुळवून आणल्याबद्दल श्री शरदचंद्र पवार साहेब यांचे खाजगी सचिव श्री रानडे साहेब यांचे मनःपूर्वक आभार.

आपला नम्र,
मंगेश मंदाकिनी नरसिंग चिवटे,
आरोग्यदूत.

Comments are closed.