वातावरण बदलाचा फटका, आंब्यावर तुडतुड्याचा प्रादुर्भाव; बागायतदार चिंतेत
सलग दोन ते तीन दिवस ढगाळ हवामान राहिल्याने हापूस बागांमध्ये तुडतुड्याचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. वातावरण थोडे निवळले असं वाटत असतानाच परत मळभ येत असल्यामुळे बागायदार चिंतेत पडले आहेत. मात्र, तुडतुडा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बागायतदारांना प्रतिबंधात्मक कीटकनाशक फवारणी सुरू करावी लागली आहे.
सद्यस्थितीत आंबा बागेत पालवी व मोहोर अशी संमिश्र स्थिती आहे. फुलोरा मोठ्या प्रमाणात आला असला तरी फळधारणेचे प्रमाण अत्यल्प आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हवामानात काही प्रमाणात बदल झाला होता. जिह्यात दुपारपर्यंत ढगाळ हवामान असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवाय थंडी व दाट धुके असल्याने हवेत दिवसभर गारवा जाणवत आहे. किनारपट्टीलगतच्या गावातून हलके वारे वाहू लागले आहे.
गेल्या पंधरवड्यात हापूस आंब्याला पोषक वातावरण होते. बहुसंख्य झाडांना पालवी फुटली आहे, तर पालवी आलेल्या कलमांना मोहरही आला आहे. मोहर आलेल्या झाडांना फळधारणा सुरू झाली आहे. झाडावर कणी ते सुपारी या आकाराची फळे लागली आहेत. मोहर ज्या प्रमाणात आला आहे, त्या प्रमाणात फळधारणेचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यातच हवामानातील बदलामुळे बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत.
फवारण्यांमुळे खर्च वाढला
परिणाम आंबा पिकावर होत आहे. सध्या पालवी व मोहर अशी संमिश्र स्थिती आहे, ढगाळ हवामानामुळे कीटक अधिक आकर्षित होतात. पालवी व मोहराचे वेळीच संरक्षण करण्यासाठी उपाययोजना करावी लागते. हवामानातील बदलाचा अंदाज घेत कराव्या लागणाऱ्या कीटकनाशक फवारणीचा खर्च वाढत आहे, असे आंबा बागायतदार महेश गानू यांनी सांगितले.
मोहर काळा पडण्याचा धोका
ढगाळ हवामानामुळे अनेक बागांमध्ये उंट अळी, शेंडे पोखरणारी अळी तसेच तुडतड्यांचा प्रादुर्भाव सुरू झाला होता. बागायतदारांनी प्रतिबंधात्मक कीटकनाशकांची फवारणी करून कीडरोगावर नियंत्रण मिळविले होते. परंतु आता तुडतुड्यासाठी पुन्हा फवारणी करावी लागत आहे. तुडतुड्याचे वेळीच नियंत्रण न केल्यास मोहर काळा पडण्याचा धोका असल्याने बागायतदार धास्तावले आहेत.
Comments are closed.