माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री! अटक वॉरंट निघाले… ‘सदनिके’तून जाणार तुरुंगात, व्हाया रुग्णालय!
बनावट कागदपत्रांच्या आधारे सदनिका लाटल्याप्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात आज अटक वॉरंट जारी केले आहे. कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवून पोलिसांना कोकाटेंवर कारवाईचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या निर्णयानंतर कोकाटे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोकाटे यांच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार असून सदनिकेतून तुरुंगात व्हाया रुग्णालय अशी त्यांची यात्रा अटळ झाली आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे केलेल्या शिफारशीनुसार कोकाटे यांच्याकडील खाती काढून घेण्यात आली आहेत. ते बिनखात्याचे मंत्री उरले आहेत.
न्यायालयाच्या निर्देशानंतर अजित पवार गटामध्ये खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षाने कोकाटे यांची तातडीने मंत्रीपदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी लावून धरली आहे. दोन वर्षांची शिक्षा झालेल्या व्यक्तीला मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार नाही, अशी प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात उमटली आहे.
कोर्टात पुढे काय होईल त्यावरच निर्णय घेऊ – अजित पवार
माणिकराव कोकाटे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा अशी मागणी होत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र निवडणुकीच्या तोंडावर सावध भूमिका घेतली आहे. न्यायालयात पुढे काय होणार त्यानुसार कोकाटे यांच्याबाबत निर्णय घेऊ, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
ही नवी प्रथा – शशिकांत शिंदे
कोर्टाचा निर्णय झाला त्या वेळीच खातं काढून घ्यायला पाहिजे होतं. मंत्रिपदाचा राजीनामा घेतलेला नाही, खातं काढून घेतलेलं आहे, आरोप झाले तरी मंत्र्यांवर कारवाई होत नाही, नवी प्रथा, नवा पायंडा सुरू झाला आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले.
मंत्रीपदावर राहता येणार नाही – अंजली दमानिया
माणिकराव कोकाटे यांनी सत्र न्यायालयाच्या निर्णयावर उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे म्हटले आहे. मात्र लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम 8 4 नुसार दोषी ठरलेल्या लोकप्रतिनिधींना अपील प्रलंबित असताना दिलासा मिळत होता, परंतु सर्वोच्च न्यायालयाने ते असंवैधानिक ठरवून रद्द केले आहे. त्यामुळे कोकाटे यांनी उच्च न्यायालयात अपील केले तरी त्यांना राजकीय दिलासा मात्र मिळणार नाही, असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. शिक्षा दोन वर्षांची किंवा त्यापेक्षा जास्त असतानाच मंत्रीपद रद्द होते, असे दमानिया म्हणाल्या.
मंत्रीपदावर ठेवू नका – प्रकाश आंबेडकर
एखाद्या व्यक्तीला दोन वर्षांची शिक्षा झाली तर त्याला आमदार, खासदार किंवा नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदेच्या सदस्यपदी राहता येत नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कोकाटे प्रकरणात कायद्याचा अवमान होणार नाही याची काळजी घ्यावी आणि कोकाटे यांना क्षणभरही मंत्रीपदावर ठेवू नये, असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
कोकाटेंची आमदारकी तत्काळ रद्द करा! रोहित पवार यांची विधानसभा अध्यक्षांकडे मागणी
माणिकराव कोकाटे यांना शिक्षा झाल्यानंतरही कायद्याचा गाढा अभ्यास असणारे विधानसभा अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर कोकाटेंची आमदारकी रद्द का करत नाहीत? कायद्यानुसार लोकसभेत राहुल गांधींचे आणि महाराष्ट्रात सुनील केदार यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. मग कोकाटेंना वेगळा न्याय का? की कोकाटे कायद्यापेक्षा मोठे आहेत? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. कोकाटेंची आमदारकी रद्द करून आदर्श प्रस्थापित करावा…! असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.
कायद्यापुढे कुणीही मोठा नाही
कोकाटे आजारी असून रुग्णालयात दाखल असल्याचा युक्तिवाद त्यांच्या वकीलांनी आज जिल्हा न्यायालयात केला. मात्र, ते कागदोपत्री पुरावा देवू शकले नाही. त्यांची ही सबब फेटाळून लावत कायद्यापुढे कोणीही मोठा नाही, असे न्यायालयाने ठणकावून सांगितले. कोकाटे यांच्या अटकेचे आदेश पारीत केले. कोकाटे यांनी त्वरित पोलिसांना शरण जावे किंवा पोलिसांनी कोकाटेंना अटक करावी, असे हे आदेश आहेत. ती कारवाई करावीच लागेल, अशी माहिती अॅड. आशुतोष राठोड यांनी दिली.
राजीनामा उपमुख्यमंत्र्यांकडे दिला उद्याच्या सुनावणीची प्रतीक्षा
कोकाटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राजीनामा दिला आहे. त्याला अजित पवारांच्या कार्यालयाने दुजोरा दिला. कोकाटे यांनी शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिले असून त्यावर शुक्रवारी न्यायमूर्ती आर. एन. लढ्ढा यांच्या एकलपीठासमोर सुनावणी होणार आहे. त्याच्या सुनावणीनंतरच कोकाटेंच्या मंत्रीपदाचे भवितव्य ठरेल.
क्रीडा मंत्रालयाचा प्रभार अजितदादांकडे
माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्याकडील क्रीडा मंत्रीपदाचा प्रभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकाटे यांचे क्रीडा खाते काढण्याची शिफारस राज्यपालांकडे केली होती. त्यानंतर कोकाटे यांचे खाते अजित पवारांकडे देण्यात आले असल्याची माहिती आहे. क्रीडामंत्रीपद महायुतीमध्ये अजित पवार गटाकडेच असल्याने आता त्या पदावर कुणाची वर्णी लागते यावरून चर्चा सुरू झाली आहे.
चार दिवसांची मुदत देण्यास न्यायालयाचा नकार
नाशिक शहराच्या कॅनडा कॉर्नर भागात सन 1995 मध्ये शासनाच्या कोटय़ातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी असलेल्या सदनिका माणिकराव कोकाटे व बंधू विजय यांनी खोटय़ा कागदपत्रांच्या आधारे घेतल्याचा आरोप होता. याप्रकरणी माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी तक्रार केली होती. दिघोळे यांच्या निधनानंतर त्यांची कन्या ऍड. अंजली दिघोळे-राठोड यांनी लढा दिला. या घोटाळ्याप्रकरणी नाशिक येथील प्रथम वर्ग न्यायालयाने 20 फेब्रुवारी 2025 रोजी मंत्री कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा आणि पन्नास हजारांचा दंड ठोठावला होता. या निकालाला कोकाटे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान दिले असता या न्यायालयानेही मंगळवारी दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली, दहा हजारांचा दंड केला. यावर आज पुन्हा सुनावणी पार पडली. यावेळी कोकाटे यांच्या वतीने कोर्टाला विनंती करण्यात आली. चार दिवसांची मुदत मिळावी असे वकील म्हणाले. मात्र अशी मुदत देण्यास न्यायालयाने नकार दिला.
Comments are closed.