मणिपूर अजूनही तणावाच्या छायेत आहे.

वृत्तसंस्था/ इंफाळ

मणिपूरमध्ये हिंसाचारामुळे पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. कांगपोकपी जिह्यात कथित दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या 52 वर्षीय अजिनबू आर यांचे शीर अद्याप न सापडल्यामुळे संतप्त झालेल्या नागा नागरी समाज संघटना असलेल्या ‘जॉइंट ट्राइब्स कौन्सिल मणिपूर’ने 48 तासांच्या आत शीर कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्याचा अल्टिमेटम दिला आहे. जोपर्यंत शीर सापडत नाही, तोपर्यंत शवविच्छेदन होऊ देणार नाही, असे संघटनेने स्पष्टपणे म्हटले आहे. या ताज्या हिंसाचारासाठी त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारला जबाबदार धरत मागणी पूर्ण न झाल्यास कडक पवित्रा घेण्याचा इशाराही दिला आहे.

शनिवारी कांगपोकपी जिह्यातील मकुई अशंग गावात झालेल्या कथित हल्ल्यात अजिनबू आर. यांची हत्या झाली. त्यांचा धड नसलेला मृतदेह रविवारी रात्री शवविच्छेदनासाठी इम्फाळ येथील जवाहरलाल नेहरू वैद्यकीय विज्ञान संस्थेत आणण्यात आला. या घटनेचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ देखील व्हायरल होत असून त्यामध्ये लष्करी गणवेशातील सशस्त्र लोकांच्या गर्दीत अजिनबू यांचे धड नसलेले शीर दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

तीन जिह्यांमध्ये गोळीबारात नऊ जणांचा मृत्यू

गेल्या आठवड्यात मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या ताज्या घटनांमध्ये शुक्रवार आणि शनिवारी कामजोंग, उखरुल आणि कांगपोकपी जिह्यांमध्ये किमान नऊ जण ठार झाले. या हिंसाचाराला शुक्रवारी रात्री कामजोंग जिह्यातील चस्साद गावात सुरुवात झाली. तेथे अज्ञात हल्लेखोरांनी महिलेची गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर कुकी आणि नागा सशस्त्र दलांमध्ये संघर्ष उफाळला होता.

Comments are closed.