मणिपूरचे दोन उपमुख्यमंत्री एकमेकांशी भिडले.

भाजपच्या नेत्यांदरम्यान वाढले टेन्शन :

वृत्तसंस्था, इंफाळ

मणिपूरमध्ये मैतेई-कुकी संघर्षादरम्यान आता नागा आणि कुकी समुदायांदरम्यान तणाव शिगेला पोहोचला आहे. राज्याच्या कुकी उपमुख्यमंत्री नेमचा किपगेन यांनी स्वत:चे समकक्ष नागा उपमुख्यमंत्री लोसी दिखो आणि 8 अन्य नागा आमदारांकडून करण्यात आलेले गंभीर आरोप फेटाळले आहेत. माझ्यावर अन् माझ्या पतीवर कुकी उग्रवाद्यांसोबत साटंलोटं असल्याचा करण्यात आलेला आरोप आधारहीन आहे. अशाप्रकारचा आरोप समुदायांदरम्यान पूर्वीपासून नाजुक झालेल्या विश्वासाला नुकसान पोहोचवत असल्याचा दावा किपगेन यांनी केला आहे.

अमित शाह यांना पत्र

1 सप्टेंबर रोजी नागा उपमुख्यमंत्री लोसी दिखो आणि 8 नागा आमदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून किपगेन आणि त्यांचे पती थंगबोई (केएनएफ प्रमुख) विरोधात कारवाईची मागणी केली होती. किपगेन कुकी उग्रवादी समुहांना मदत पुरवत आहेत आणि नागा ओलिसांच्या हत्येत अप्रत्यक्षपणे सामील राहिल्याचा आरोप नागा आमदारांनी केला आहे.

मी उपमुख्यमंत्री झाल्यावरच नागा आणि कुकी समुदायांदम्यान तणाव इतक्या वेगाने का भडकला याचा विचार करणे मला भाग पाडले आहे. पूर्वी अशा घटनांमध्ये कधीच इतक्या लोकांचा जीव गेला नव्हता. काही समूह शांततापूर्ण कांगपोकपी जिल्हा आणि मला लक्ष्य करण्यासाठी हिंसा भडकवत असल्याचे प्रत्युत्तर किपगेन यांनी दिले आहे. किपगेन यांचे पती थंगबोई ‘कुकी नॅशनल फ्रंट’चे (केएनएफ) प्रमुख आहेत, जो केंद्रासोबत सस्पेंशन ऑफ ऑपरेशन्स कराराच्या अंतर्गत येतो. एसओओ समुहांच्या कारवायांची देखरेख केंद्र आणि राज्य सरकार मिळून करत असल्याचे स्पष्टीकरण किपगेन यांनी दिले आहे.

अपहरणावेळी होते विमानात!

कुकी उग्रवाद्यांनी नागा लोकांचे अपहरण केले होते, तेव्हा किपगेन यांनी स्वत:चा मोबाइल बंद ठेवला होता असा आरोप नागा आमदारांनी केला होता. 13 मे रोजी 3 कुकी चर्च पदाधिकाऱ्यांची घात लावून हत्या करण्यात आली होती, तेव्हा मी विमानात होते. विमानातून उतरल्यावर मिस्ड कॉल पाहून त्वरित मुख्यमंत्री आणि नागरी संघटनांशी संपर्क साधला होता, माझ्या वैयक्तिक हस्तक्षेपामुळे 15 मे रोजी 18 नागा ओलिसांची विनाशर्त मुक्तता होऊ शकली होती. 11 मार्च रोजी 2 कुकी नागरिकांच्या हत्येनंतरही माझ्या प्रयत्नांमुळेच स्थानिक लोकांकडून रोखण्यात आलेल्या 21 तांगखुल नागा प्रवाशांची सुरक्षित मुक्तता होऊ शकली होती असा दावा किपगेन यांनी केला आहे.

मणिपूरमध्ये सत्तेचे जटिल समीकरण

राष्ट्रपती राजवट हटल्यावर स्थापन नव्या सरकारमध्ये केंद्राने तीन प्रमुख समुदायांना संतुलित करण्यासाठी मैतेई नेते युमनाम खेमचंद सिंह यांना मुख्यमंत्री, तर कुकी समुदायामधून नेमचा किपगेन आणि नागा समुदायामधून लोसी दिखो यांना उपमुख्यमंत्री केले होते. सुरक्षेच्या कारणास्तव किपगेन यांनी दिल्लीतून व्हर्च्युअल शपथ घेतली होती. त्या इंफाळला जाण्याऐवजी कांगपोकपी येथून प्रशासनाचे प्रतिनिधित्व करत आहेत. केंद्र सरकारने किपगेन यांच्या विरोधात कारवाई न केल्यास मणिपूर सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेऊ असा इशारा नागा आमदारांनी दिल्याने राज्यातील संकट आणखी गडद झाले आहे.

Comments are closed.