'मान की बाट' आत्मनिर्भरतेवर लक्ष केंद्रित करते

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रशंसा, खादी विकत घेण्याचे केले आवाहन

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भारताला महाशक्ती बनण्यासाठी ‘आत्मनिर्भरते’चीच कास धरली पाहिजे, असे स्पष्ट प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ते ‘मन की बात’ या कार्यक्रमात देशाला उद्देशून त्यांचे मनोगत शनिवारी व्यक्त करीत होते. यावर्षी दसऱ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संस्था आपल्या स्थापनेची 100 वर्षे पूर्ण करीत आहे. या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघाच्या प्रदीर्घ राष्ट्रकार्याची प्रशंसा या कार्यक्रमात केली आहे. तसेच येत्या गांधी जयंतीला देशातील जनतेने मोठ्या प्रमाणात ‘खादी’ खरेदी करुन स्वदेशीचा पाया बळकट करावा, असे महत्वपूर्ण आवाहनही त्यांनी या दिवसाचे औचित्य साधून केले आहे.

नि:स्वार्थ देशसेवेचे कृतीशील ध्येय आणि शिस्तबद्धता हे दोन गुण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बलस्थाने आहेत. या संस्थेचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार आणि नंतरचे सरसंघचालक माधव गोळवलकर गुरुजी यांनी या संस्थेच्या देशसेवा ध्येयाचा पाया रचला आहे. देशासमोर कोणतेही संकट उद्भवले, किंवा नैसर्गिक आपत्ती देशावर कोसळल्या, तरी सर्वप्रथम संघस्वयंसेवक जनतेच्या साहाय्यार्थ धावून येतात. या संस्थेच्या संस्कारांमुळे संघस्वयंसेवकांचा सेवाभावी पिंड घडला आहे. त्यामुळे आज ही संस्था देशातील सेवाकार्यांचा स्रोत बनली आहे, अशी भलावण करत, त्यांनी संघाच्या कार्याचा यथोचित शब्दांमध्ये गौरव आपल्या मनोगतात केला.

छटपूजा हा देशाचा वारसा

उत्तर भारतात पुरातन काळापासून छटपूजा उत्सव साजरा करण्यात येतो. हा उत्सव भारताचा अत्यंत मोठा असा अमूर्त सांस्कृतिक वारसा आहे. छटपूजेला युनेस्कोच्या जागतिक ‘अमूर्त सांस्कृतिक वारसा’ सूचीत समाविष्ट करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे. तो यशस्वी झाल्यास साऱ्या जगाला या पूजेचे पावित्र्य अनुभवता येईल. पश्चिम बंगालमधील दुर्गापूजा उत्सवाचा समावेश यापूर्वीच या सूचीत करण्यात आला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

दोन महिला अधिकाऱ्यांचा उल्लेख

भारतीय नौदलाच्या दोन महिला अधिकाऱ्यांनी नुकतेच ‘नाविका सागर परिक्रमा’ अभियान यशस्वी केले आहे. लेफ्टनंट कमांडर दिलना आणि लेफ्टनंट कमांडर रुपा अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी देशाच्या सन्मानात भोलाची भर घातली आहे, अशा शब्दांमध्ये त्यांनी या दोन महिला अधिकाऱ्यांचा गौरव केला आहे.

एस. एल. भैराप्पा यांचे स्मरण

कर्नाटकातील जगप्रसिद्ध कन्नड लेखक आणि विचारवंत एस. एल. भैराप्पा यांचे नुकतेच निधन झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भैराप्पा यांचे लेखन क्षेत्रातील कार्य आणि त्यांचे विचार यांचा गौरव मन की बातमध्ये केला. भैराप्पा यांच्याशी आपला व्यक्तीगत संपर्क होता. अनेक विषयांवर आमची चर्चा होत असे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या संदेशात आवर्जून स्पष्ट पेले.

सर्वाधिक जोर ‘स्वदेशी’वर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही 129 वी ‘मन की बात’ होती. या कार्यक्रमात त्यांनी सर्वाधिक भर स्वदेशी आणि आत्मनिर्भरता यावर दिल्याचे दिसून आले आहे. भारताला खऱ्या अर्थाने प्रगती करायची असेल, तर भारतीयांनी स्वदेशीचा मंत्र आचरणात आणावयास हवा आहे. ज्या वस्तू भारतीयांच्या कष्टाने बनल्या आहेत आणि ज्या वस्तू बनविण्यात भारतीयांचे हात लागले आहेत, अशा वस्तूंचीच खरेदी आपण करु, असा निर्धार भारतीयांनी केला पाहिजे. आपण अधिक काळ अन्य देशांवर विसंबून राहू शकत नाही. आर्थिक परावलंबित्व देशाचा विकास मोठ्या प्रमाणात घडवू शकणार नाही. त्यामुळे भारतीय नागरीकांनी स्वदेशीचे तत्व स्वीकारुन आपल्या देशभक्तीचा परिचय द्यावा, अशा अर्थाचे आवाहन त्यांनी केले.

देशवासियांना कळकळीचे आवाहन

ड स्वदेशी आणि आत्मनिर्भरता हेच मार्ग भारतासाठी आहेत सर्वाधिक हिताचे

ड नि:स्वार्थ देशसेवा, शिस्तबद्धता ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रमुख बलस्थाने

ड भारतीय महिला नौदल अधिकाऱ्यांचा परिक्रमा पराक्रम अत्यंत अनुकरणीय

ड ‘छट पूजा’ हा सांस्कृतिक वारसा, त्याला युनेस्कोत स्थान देण्यासाठी प्रयत्न

Comments are closed.