नांदेड दौऱ्यादरम्यान मनोज जरांगेंची तब्येत बिघडली
मराठा आंदोलक मनोज जरांगे हे नांदेड दौऱ्यावर आलेले असताना अचानक त्यांची तब्येत बिघडली. जरांगे यांना अचानक चक्कर आल्याचे समजते. डॉक्टरांनी त्यांना तपासले असून सध्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
मनोज जरांगे हे 29 ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलनाला बसणार आहेत. त्याआधी ते सध्या संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. आज ते नांदेड दौऱ्याला आले होते. त्यावेळी त्यांना चक्कर आली. त्यानंतर त्यांना शासकीय विश्रामगृहात नेण्यात आले व तिथे डॉक्टरांची टीम दाखल झाली. डॉक्टरांनी त्यांना तपासल्यानंतर सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र दौऱ्यानिमित्ताने जरांगे यांच्या सतत बैठका व गाठीभेटी सुरू आहे. शुक्रवार सकाळपासूनच नांदेड येथे त्यांनी मराठा समाजातील कार्यकर्त्यांसोबत सलग बैठकांचं आयोजन केलं होतं. त्यामुळे सततच्या बैठका व दौऱ्यांमुळे त्यांना अशक्तपणा आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
Comments are closed.