जरांगे भिडले; ही माझी शेवटची लढाई, मरेन पण लढेन!
‘माझ्यासाठी मराठा समाज सर्वोपरी आहे. समाजासाठी मी मरण पत्करेन, पण सरकारला शरण जाणार नाही!’ अशा शब्दांत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील सरकारला भिडले. मुंबईत आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी नाकारलेली असतानाही मनोज जरांगे यांचा काफिला मंगळवारी आंतरवालीतून मुंबईकडे मार्गस्थ झाला. पाटोदा येथे मुक्काम करून हा काफिला श्रीगोंद्याकडे रवाना होणार आहे.
मराठा आरक्षणासाठी गेल्या अठरा दिवसांपासून आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केले आहे. सरकार आणि जरांगे यांच्या चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या, परंतु तोडगा निघू शकला नाही. त्यानंतर सरकारने चर्चेचे दरवाजे बंद केले. तेव्हापासून ही कोंडी कायम आहे. 12 सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा निर्णय झाला. त्याप्रमाणे आज मनोज जरांगे यांनी सकाळी 11 वाजता आंतरवालीतून मुंबईकडे प्रस्थान केले. आंतरवालीतून निघताना मनोज जरांगे यांना अश्रू अनावर झाले. जरांगे यांची पत्नी, मुलगा आणि मुलीलाही यावेळी भावना अनावर झाल्या.
अठरा दिवसांच्या उपोषणामुळे मनोज जरांगे यांची प्रकृती अतिशय क्षीण झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, ग्रामदेवतेचे दर्शन घेतल्यानंतर महिलांनी औक्षण करून मनोज जरांगे यांना निरोप दिला. सर्व मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत, तोपर्यंत माघार नाही. मराठा समाजासाठी एकवेळ मरण पत्करेन, पण सरकारला शरण जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका यावेळी जरांगे यांनी मांडली. गणेशोत्सवाच्या आडून सरकार खेळ करत असल्याचाही त्यांनी आरोप केला. परंतु न्यायदेवता आमच्या पाठीशी आहे, त्यामुळे सरकार कितीही आडवे आले तरी आझाद मैदानावर जाणारच, असेही जरांगे म्हणाले. मराठा कार्यकर्त्यांनी शांतता राखावी, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यकर्त्यांचा ताफाही सोबतच
मी एकटाच मुंबईत जाणार असे मनोज जरांगे यांनी जाहीर केले आहे. आपल्यासोबत कुणीही येऊ नये असे आवाहनही त्यांनी केले. परंतु मराठा कार्यकर्त्यांनी आम्ही मनोज जरांगे यांच्यासोबतच जाणार असल्याचे स्पष्ट केले. मनोज जरांगे यांच्या ताफ्यात दोन गाडय़ा, एक रुग्णवाहिका आहे. मात्र पाठीमागे कार्यकर्त्यांच्या शेकडो गाडय़ाही मुंबईकडे निघाल्या आहेत.
पावलापावलावर पोलीस
मनोज जरांगे यांचा काफिला ज्या मार्गाने मुंबईकडे जाणार आहे, त्या मार्गावर सरकारने पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला होता. आंतरवाली सराटी ते शहागड मार्गावर 650 पोलीस बंदोबस्तावर ठेवण्यात आले होते. त्यात 3 उपविभागीय पोलीस अधिकारी, 10 पोलीस निरीक्षक, 20 सहायक व उपनिरीक्षक, 300 पोलीस कर्मचारी, 265 होमगार्ड आणि आरसीपीच्या दोन प्लाटूनचा समावेश होता.
मराठा आंदोलकांच्या तेरापैकी बारा मागण्या मान्य ः मुख्यमंत्री
राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य केल्या आहेत. त्यावर अंमलबजावणीही सुरू आहे. उर्वरित मागण्या या न्यायालयीन परिघात येत असल्यामुळे त्याचा विचार कायदेशीर चौकटीतच होऊ शकतो. त्यामुळे मनोज जरांगे यांनी मुंबईतील आंदोलनाचा पुन्हा विचार करावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सध्या गणेशोत्सव सुरू आहे. अशा पद्धतीने भूमिका न घेता सणासुदीच्या दिवसांत कोणालाही त्रास होणार नाही असा निर्णय मनोज जरांगे-पाटील यांनी घेणे अपेक्षित आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मनोज जरांगे यांची भाषा अयोग्यच! कॅबिनेट बैठकीत मंत्र्यांचा नाराजीचा सूर
आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या भाषेवरून सर्वच मंत्र्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्य सरकार मराठा समाजासाठी निर्णय घेत असताना आंदोलनकर्त्यांकडून सातत्याने वापरली जाणारी भाषा आक्षेपार्ह असल्याची भूमिका मंत्र्यांनी मांडल्याचे सूत्रांनी सांगितले. गणेशोत्सवाच्या काळातच मुंबईतच आंदोलन का, असा सवालही काही मंत्र्यांनी केला.
परवानगीसाठी पोलिसांकडे तिसरा अर्ज
मनोज जरांगे यांच्या वतीने मुंबई पोलिसांकडे आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी मागणारे दोन अर्ज करण्यात आले होते. मात्र गणेशोत्सवाचा काळ असल्याने मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली. आता तिसऱ्यांदा परवानगीचा अर्ज करण्यात आला आहे. पोलिसांनी अद्याप त्यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. दुसरीकडे मराठा समन्वयकांनी आज आझाद मैदानाची पाहणी केली.
मी मरण पत्करेन, पण सरकारला शरण जाणार नाही. कोण गोळय़ा घालतेय पाहू, मी मुंबईला जाणार म्हणजे जाणारच! मराठय़ांच्या लेकरांपेक्षा दुसरं काहीही मोठं नाही.
Comments are closed.