गौतम गंभीर दुतोंडी! माजी क्रिकेटपटूने फटकारले, IND Vs Pak सामन्यावरून भडकला

आशिया कप मालिकेतील IND vs Pak सामन्यावरून सध्या देशभरात वाद सुरू आहे. टीम इंडिया पाकिस्तानविरोधात खेळत असल्याने चाहते BCCI वर भडकले आहेत. अशातच टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीने या सामन्याला कडाडून विरोध केला होता. आता त्याने यावरूनच टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर जोरदार निशाणा साधला आहे. मनोज तिवारीने गौतम गंभीरला ढोंगी, दुतोंडी म्हणत त्याच्यावर सडकून टीका केली.

‘गंभीर नेहमीच मला ढोंगी व दुतोंडी वाटत आला आहे. तो जेव्हा प्रशिक्षक नव्हता तेव्हा त्याने पाकिस्तानसोबत खेळू नये अशी भूमिका घेतली होती. पण आता तो टीम इंडियाचा प्रशिक्षक आहे तर आता टीम इंडिया पाकिस्तानविरोधात खेळणार आहे. जर त्यावेळी त्याला पाकिस्तानसोबत खेळायचे नव्हते तर आता तो याला विरोध का करत नाही? राजीनामा का देत नाही?, असा सवाल मनोज तिवारीने केला आहे.

मनोज तिवारीने यशस्वी जैस्वालला टीम इंडियात संधी न देण्यावरूनही गौतम गंभीरवर टीका केली आहे. ”गंभीरनेच यशस्वी जैस्वालला टीम इंडियाचं भविष्य असल्याचं म्हटलं होतं. पण आता कृती करताना मात्र त्याने यशस्वीला संघाबाहेर ठेवलं आहे. तो नेहमी बोलतो एक आणि करतो एक”, असे मनोज तिवारी म्हणाला.

Comments are closed.