ऑस्ट्रियाशी अनेक महत्त्वाचे करार

चॅन्सेलर स्टॉकर यांच्याशी पंतप्रधान मोदींची चर्चा

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी नवी दिल्लीच्या हैदराबाद हाउसमध्ये ऑस्ट्रियाचे चॅन्सेलर डॉ. क्रिश्चियन स्टॉकर यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली आहे. या बैठकीचा मुख्य उद्देश भारत आणि ऑस्ट्रियादरम्यान परस्पर संबंधांना आणखी मजबूत करणे आहे. बैठकीदरम्यान विदेशमंत्री जयशंकर आणि केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल देखील उपस्थित होते. या बैठकीदरम्यान दोन्ही देशांदरम्यान अनेक महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षरी झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑस्ट्रियाचे चॅन्सेलर स्टॉकर यांच्यासोबतच्या संयुक्त वक्तव्यात दोन्ही देशांचे संबंध मजबूत करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. चॅन्सेलर स्टॉकर यांचा हा दौरा व्यापार आणि गुंतवणुकीत नवी ऊर्जा आणणार आहे. भारत आणि ऑस्ट्रिया मिळून तंत्रज्ञान आणि पुरवठासाखळी मजबूत करत जगाला विश्वासार्ह उपाय मिळवून देणार असल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत. दोन्ही देश संरक्षण, सेमीकंडक्टर, क्वांटम आणि जैवतंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रांमध्येही सहकार्य वाढविणार आहेत.

तसेच आयआयटी दिल्ली आणि ऑस्ट्रियाच्या मॉन्टेना विद्यापीठादरम्यान झालेला करार या सहकार्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे.  2023 मध्ये झालेल्या स्थलांतर आणि मोबिलिटी कराराच्या अंतर्गत आता नर्सिंग सेक्टरमध्येही लोकांना काम करण्याची संधी खुली केली जाणार आहे. याचबरोबर संशोधन आणि स्टार्टअप्समध्ये दोन्ही देश एकत्र काम करणार आहे. भारत आणि ऑस्ट्रियाने मिळून ‘वर्किंग हॉलिडे प्रोग्राम“ही सुरू केला असून यामुळे युवांना नव्या संधी प्राप्त होतील असे मोदींनी नमूद पेले आहे.

जागतिक तणावाचा संदर्भ

वर्तमान जागतिक तणावादरम्यान युद्धामुळे समस्यांवर तोडगा निघू शकत नाही यावर दोन्ही देश सहमत आहेत. युक्रेन असो किंवा पश्चिम आशिया दोन्ही ठिकाणी आम्ही शांतता आणि स्थिरतेचे समर्थन करतो अशी भूमिका मोदींनी मांडली आहे.

चॅन्सेलर स्टॉकर यांचा पहिला दौरा

2025 मध्ये पद स्वीकारल्यापासून स्टॉकर यांचा हा पहिला भारत आणि आशिया दौरा आहे. चॅन्सेलर स्टॉकर यांच्यासोबत या दौऱ्यात एक मोठे शिष्टमंडळही आले आहे. यात अनेक दिग्गज उद्योजक, वरिष्ठ मंत्री आणि शासकीय अधिकारी सामील आहेत. या दौऱ्याचा मुख्य उद्देश आर्थिक संबंधांना चालना देणे आहे. दोन्ही देशांनी मिळून हरित तंत्रज्ञान, डिजिटल नवोन्मेष, नुतनीकरणीय ऊर्जा आणि हाय-एंड उत्पादन यासारख्या क्षेत्रांमध्ये काम करण्याची योजना आखली आहे.

Comments are closed.