पाच राज्यांमध्ये अनेक प्रकल्प सुरू झाले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोनशीला स्थापन
वृत्तसंस्था/भोपाळ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थान, मध्यप्रदेश आणि कर्नाटक राज्यांकरिता अनेक मोठ्या ऊर्जानिर्मिती प्रकल्पांचा शुभारंभ केला आहे. त्यांनी गुरुवारी राजस्थानात 1 लाख 22 हजार कोटी रुपयांच्या वीज निर्मिती प्रकल्पांच्या कोनशीलांची स्थापना केली. बन्सवाडा येथे हा कार्यक्रम पार पडला. येथे त्यांनी मा त्रिपुरा सुंदरी आणि मा माही यांच्या मंदिरांमध्येही पूजाआर्चा केली. या कार्यक्रमात त्यांनी राजस्थानसह मध्यप्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रासाठी एकंदर 90 हजार कोटी रुपयांच्या वीजनिर्मिती आणि इतर पायाभूत सुविधा प्रकल्पांची घोषणा केली. राजस्थानात त्यांनी अनेक सौरऊर्जा आणि अणुऊर्जा प्रकल्पांची कोनशीला स्थापन केली. तसेच वीज वहन ग्रीड प्रकल्पाचाही शुभारंभ केला. या प्रकल्पांमध्ये माही बन्सवाडा अणुऊर्जा प्रकल्पाचाही समावेश आहे. या प्रकल्पासाठी 42 हजार कोटी रुपयांचा व्यय होणार असून त्यातून हजारो युवकांना रोजगार प्राप्ती होणार आहे. हा भारतातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पांपैकी एक ठरणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
सौरऊर्जेवर देणार भर
भारत पुढच्या काळात सौरऊर्जा निर्मितीवर प्रामुख्याने भर देणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राजस्थानातील जैसरमेर, फलोदी, जालोर, सिकर आणि बिकानेर या भागांसाठी सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पांचा प्रारंभही केला. नवरात्र उत्सवात आपण शक्तीमातेच्या 9 रुपांची पूजा करतो. याच कालावधीत त्यामुळे आम्ही ‘ऊर्जा शक्ती’ या नव्या शक्तीरुपाचीही आराधना करण्यास प्रारंभ केला आहे. सौरऊर्जा क्षेत्रात राजस्थान मोठी प्रगती करु शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राजस्थानात त्यांनी पुनउ&पयोगी ऊर्जा निर्मिती प्रकल्पांचे आणि वीजेचे वहन करण्यासाठीच्या प्रकल्पांचेही उद्घाटन करत देशाची पुढची दिशा स्पष्ट केली.
सर्व खेड्यांना आता वीजपुरवठा
2014 मध्ये भारतात 18 हजार खेडी अशी होती, की जेथे त्यापूर्वीच्या 70 वर्षांमध्ये वीज पोहचली नव्हती. मात्र, आमच्या सरकारने आता देशातील सर्व खेड्यांपर्यंत वीज पोहचविली आहे. आज देशात एकही गाव असे नाही, की जेथे वीज मिळत नाही, असे प्रतिपादनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
Comments are closed.