तारापूरमध्ये अनेकांचा श्वास कोंडला, एमआयडीसीत वायुगळती; कामगारांमध्ये घबराट
तारापूर एमआयडीसीतील डी प्लॉट या भागात अचानक वायुगळती सुरू झाल्याने कामगारांमध्ये घबराट निर्माण झाली. अनेकांचा श्वास कोंडला, डोळ्यांची जळजळ तसेच मळमळ होत असल्याने काहींना थेट रुग्णालयात दाखल करावे लागले. दरम्यान ही वायुगळती नेमक्या कोणत्या कारखान्यातून झाली याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. मात्र या घटनेमुळे तारापूर एमआयडीसीमधील हजारो कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
काही दिवसांपूर्वी तारापूर एमआयडीसीतील भगेरिया इंडस्ट्रीज व आरती फार्मा लॅब येथेही वायुगळतीची घटना घडली होती. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. रविवारी संध्याकाळच्या सुमारास अचानक डी प्लॉट परिसरात वायुगळती सुरू झाली आणि कामगारांना श्वास घेणेही कठीण झाले. आयव्हीपी लिमिटेड या कंपनीतील राहुल बोध या कामगाराला कुलकर्णी हॉस्पिटल येथे तातडीने दाखल केले.
गणेश बेंजो फास्ट लिमिटेड या कंपनीतील कामगारांनी थेट कारखान्याबाहेर धाव घेतली. जीएम टेक्स्टाईलमधील कामगारांसह सुरक्षा कर्मचाऱ्याला उलट्या सुरू झाल्या. सियाराम टेक्स्टाईल, तुषा टेक्स व प्रोटोकेमिकल इंडस्ट्रीज या कारखान्यांमधील कामगारांनाही वायुगळतीचा प्रचंड त्रास झाल्याने त्यांनी सुरक्षितस्थळी धाव घेऊन आपला जीव वाचवला.
प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई का नाही
वायुगळतीची माहिती समजताच अग्निशमन दल व पोलिसांनी घटनास्थळी जाऊन विविध कारखान्यांची पाहणी केली. पण नेमकी वायुगळती कुठून सुरू झाली हे समजू शकले नाही. तारापूर एमआयडीसीत वारंवार वायुगळतीच्या घटना घडूनही प्रदूषण नियंत्रण महामंडळाने दोषींवर कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे कामगारांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
Comments are closed.