अंतरवली सराटीकडे जाताना मराठा आंदोलकाचा दुर्देवी मृत्यू
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी पहिल्या दिवशीच अंतरवली सराटीकडे जात असताना रस्त्यातच हृदयविकाराचा झटका आल्याने मराठा आंदोलकाचा दुर्देवी मृत्यू झाला.
आरक्षणाचा लढा अजूनही सुरूच आहे. मनोज जरांगे पाटील अंतरवली सराटी येथे शनिवारपासून उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या या आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. नुकताच मनोज जरांगे पाटील यांनी प.महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये दौरा केला होता. त्या दौर्याला मोठा प्रतिसाद मिळाला होता. २९ ऑगस्टपासून आपण आंदोलन पुकारत असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. अंतरवली सराटी येथे आज सकाळी त्यांनी आमरण उपोषण सुरू केले. या आंदोलनामध्ये राज्याच्या सर्व मराठा समाजातील बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले होते. त्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठीच केज येथील सुग्रीव बापू शिंदे (५५) हे अंतरवली सराटीकडे जात असताना रस्त्यामध्येच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यात त्यांचे दुर्देवी निधन झाले. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.
Comments are closed.