Maratha tourism train to take visitors on a tour of forts in Maharashtra
महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की आपल्या सर्वांचाच ऊर अभिमानाने भरून येतो. मराठा साम्राज्याचे संस्थापक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या शौर्याने मुघल, आदिलशाही , कुतुबशाही, निजामशाही अशा अनेक परकीय आक्रमणांपासून आपल्या स्वराज्याचे रक्षण केले. महाराजांच्या याच शौर्याची साक्ष देणारे आणि त्यांच्या अस्तित्त्वाची अनुभूती देणारे अनेक गडकिल्ले महाराष्ट्रात आहेत.
हा शेकडो वर्षांपूर्वीचा इतिहास आजच्या आणि भविष्यातील पिढीला समजावा यासाठी अनेक प्रयत्न होत असतात. आपला इतिहास समजून घेण्यासाठी त्याच्याशी संबंधित अशा वास्तूंना आपण नक्की भेट द्यायला हवी. आपल्या महाराष्ट्रात शेकडो गडकिल्ले आहेत. हे किल्ले लोकांनी पाहावे, इथले पर्यटन वाढावे आणि इथल्या इतिहासाची , महाराजांच्या आणि त्यांच्या शूरवीर मावळ्यांच्या पराक्रमाची जाणीव सगळ्यांना व्हावी यासाठी अनेक प्रयत्न होत असतात. असाच एक भन्नाट उपक्रम रेल्वेच्या माध्यमातून सुरू होत आहे. तो म्हणजे मराठा पर्यटन ट्रेन!
राज्यातील सर्व पर्यटनप्रेमींसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांना जोडणारी मराठा पर्यटन ट्रेन ही 9 जूनपासून सुरू होणार आहे. या ट्रेनच्या माध्यमातून प्रवास करणे आणि महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांचा, सांस्कृतिक ठेव्यांचा आणि धार्मिक स्थळांचा अविस्मरणीय अनुभव घेणे पर्यटकांसाठी पर्वणी ठरणार आहे.
आयआरसीटीसी म्हणजे इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन द्वारे संचलित केली जाणारी ही ट्रेन आहे. या खास मराठा पर्यटन उपक्रमांतर्गत 6 दिवसांच्या प्रवासात देशभरातील रेल्वे प्रवाशांना मराठा साम्राज्याच्या ऐतिहासिक ठिकाणांचा अनुभव घेता येईल. यात रायगड, शिवनेरी, प्रतापगड, पन्हाळगड, पुणे परिसर (लाल महाल, कसबा गणेश मंदिर), भीमाशंकर ज्योतिर्लिंग , कोल्हापूरचे अंबाबाई मंदिर यासारख्या ठिकाणांचा समावेश आहे.
प्रवासाचा प्रारंभ कुठून?
या ट्रेनचा प्रवास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर आणि ठाणे स्थानकांवरून सुरू होईल. यामुळे मुंबई आणि ठाण्यातील पर्यटकांना सहजपणे या विशेष ट्रेनचा लाभ घेता येईल. यानंतर ही ट्रेन पुढील प्रवास करेल आणि पुन्हा याच स्थानकांवर प्रवाशांना सोडेल.
या यात्रेच्या अंतर्गत, पर्यटन प्रेमींना एक विशेष यात्रा पॅकेज देखील दिले जाणार आहे, यात संपूर्ण प्रवासाची व्यवस्था, निवास, भोजन, तसेच स्थानिक मार्गदर्शकांची सेवा उपलब्ध असेल. या पॅकेजमध्ये विविध किल्ल्यांची आणि तीर्थस्थळांची सुसंगत माहिती दिली जाईल, ज्यामुळे पर्यटकांना एक संपूर्ण ऐतिहासिक अनुभव मिळेल. हे सर्व पर्यटन स्थळे आणि किल्ले एकाच प्रवासात पाहण्यासाठी एकत्र केल्यामुळे, पर्यटकांना एक थेट आणि सुसंगत इतिहास समजून घेण्याची संधी मिळेल. शिवाय राज्यातील पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळेल.
पर्यटन क्षेत्राला चालना
महाराष्ट्र सरकारने आयोजित केलेल्या या पर्यटन ट्रेनमुळे राज्यातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचा प्रचार होईल. या ट्रेनमुळे महाराष्ट्रातील पर्यटन व्यवसायाला नवीन दिशा मिळेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.
मराठा पर्यटन ट्रेनची बुकिंग कशी कराल?
मराठा पर्यटन ट्रेनची बुकिंग करण्यासाठी सर्वप्रथम आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइट www.irctctourism.com वर जा. वेबसाइटच्या मुख्य पेजवर ‘Holidays’ हा पर्याय निवडा आणि त्यानंतर ‘Packages’ वर क्लिक करा. पॅकेजेसच्या लिस्टमधून ‘मराठा पर्यटन ट्रेन’ किंवा ‘Bharat Gaurav Tourist Train’ हा पर्याय शोधा. तुम्ही ‘Chhatrapati Shivaji Maharaj Circuit’ असा कीवर्ड वापरून शोधू शकता. उपलब्ध तारखा आणि पॅकेज तपासा आणि तुमच्या सोयीनुसार योग्य ती तारीख आणि पॅकेज निवडा. बुकिंगसाठी तुम्हाला आयआरसीटीसी खाते असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे खाते नसल्यास, ‘Register’ पर्यायावर क्लिक करून नवीन खाते तयार करा. आधीच खाते असल्यास, तुमचे लॉगिन क्रेडेन्शियल्स (ईमेल आयडी आणि पासवर्ड) वापरून लॉगिन करा.
हेही वाचा : Protein Powder : घरीच तयार करा प्रोटीन पावडर
Edited By – Tanvi Gundaye
Comments are closed.